कोल्हापूर : येथील विमानतळाच्या नाईट लँडिंग, कार्गो सुविधा, आदींबाबत दिल्ली येथील केंद्रीय नागरी विमान उड्डाण संचालनालयाच्या (डीजीसीए) कार्यालयात आज (मंगळवारी) दुपारी अडीच वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. कोल्हापूरच्या विमानसेवेला गती देण्यासाठी आवश्यक असलेली नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यासाठी लागणारा परवाना मिळविण्यासाठी या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार आहे.
या विमानतळाच्या विस्तारीकरणासह अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत तीन आठवड्यांपूर्वी कोल्हापूमध्ये बैठक घेतली होती. त्यावेळी स्थानिक प्रश्न सोडविण्याबाबत विविध विभागांना सूचना करण्यात आल्या. ‘डीजीसीए’च्या पातळीवरील प्रश्न सोडविण्याकरिता दिल्लीमध्ये लवकरच बैठक घेणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले होते. त्यानुसार पुढाकार घेऊन त्यांनी ‘डीजीसीए’चे प्रमुख अरुणकुमार यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने उपस्थित राहणार आहेत.