कोल्हापूर : येथील विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेबाबतची माहिती एरॉनॉटिकल इन्फाॅर्मेशन पब्लिकेशन (एआयपी) या प्रणालीवर प्रकाशित झाली आहे. भारतीय नागरी विमान उड्डयन प्राधिकरणानेही परवानगी दिली. त्यामुळे कोल्हापूरविमानतळावरून ३ नोव्हेंबरपासून नाईट लँडिंगची सेवा सुरू होणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर विमानसेवेची गती, विस्तार वाढण्यास मदत होणार आहे.
राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेत कोल्हापुरातील विमानतळाच्या धावपट्टीचे १९३० मीटरपर्यंत विस्तारीकरण पूर्ण झाले. पूर्वीच्या १३७० धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली. या सुविधेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याची पाहणी डीजीसीएच्या पथकाने केली आणि परवानगी दिली. जगभरातील विमान कंपन्या, वैमानिकांना कोल्हापुरात नाईट लँडिंग सुविधेबाबतची माहिती एआयपी या प्रणालीवर प्रकाशित करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाने पाठपुरावा केला. ही माहिती या प्रणालीवर प्रकाशित झाली. त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, तांत्रिक कारणामुळे हैदराबाद-कोल्हापूर मार्गावरील विमानसेवा अलायन्स एअर कंपनीने बंद केली. त्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाला दिली आहे. या मार्गावर इंडिगो कंपनीची सेवा सुरू आहे. सध्या कोल्हापुरातून तिरुपती, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद या मार्गांवर सेवा सुरू असल्याचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले.
परवानगीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने ३ नोव्हेंबरपासून कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सेवा उपलब्ध होईल. या सुविधेसाठी धावपट्टीवर काही मार्किंगचे थोडे काम बाकी असून ते या आठवड्यात पूर्ण केले जाईल. -अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ.