कोल्हापूर : जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी क्राइम बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. महापुराचे पाणी गावागावांत शिरल्यानंतर ते स्वत: रस्त्यावर उतरले. गेले आठ दिवस त्यांच्यासह सुमारे साडेतीन हजार पोलिसांनी झोप घेतली नाही की घराकडे लक्ष दिले नाही. धोकादायक महामार्ग बंद करून नागरिकांना जागृत केले जात होते.
आंबेवाडी, चिखली, शिरोळ यांसह जिल्ह्यात ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती गंभीर आहे, लोक अडकून पडले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस स्वत:च्या जिवाची बाजी लावून पुराच्या पाण्यात शिरत होते. एक-एक करीत लोकांना सुखरूप स्थळी पोहोचविण्याचे काम पोलीस करीत होते. डॉ. देशमुख हे पुणे-बंगलोर महामार्गावर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत थांबून असत.