कोल्हापूर : गूळ उत्पादक शेतकऱ्यांना गोळ्या घालतो म्हणणाऱ्या व्यापारी नीलेश पटेलचा परवाना रद्द करनून त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेने मंगळवारी समिती प्रशासनाकडे केली. कर्नाटकातील गुळाचा खडा जरी समितीत आला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.
समितीमधील कर्नाटकातील गुळाला विरोध करणाऱ्या शेतकरी व समिती अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारे नीलेश पटेल विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहेत. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने याबद्दल समिती प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. कर्नाटकातील गूळ येथे येत असताना समिती प्रशासन काय करत होते, या प्रवृत्तीला पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य काेण? असा सवाल करत संजय पवार म्हणाले, शेतकऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवणाऱ्यांनी आमच्याकडे फावडे आहे, हे पटेलने ध्यानात ठेवावे. पटेलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
यावर, बाजार समिती घडलेला प्रकार दुर्देैवी आहे, शेतकऱ्यांना कोणी दादागिरी करत असेल तर ते खपवून घेणार नाही. नीलेश पटेल यांना नोटीस बजावली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही अशासकीय मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील यांनी दिली. जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, कृष्णात पोवार, प्रशांत नाळे, शशिकांत बीडकर, राजू यादव, विराज पाटील, समितीचे सदस्य बी. एच. पाटील, डी. जी. भास्कर, सचिव जयवंत पाटील आदी उपस्थित होते.
‘पथक’ नेमून गोडावून तपासणार
कर्नाटक गुळाची आवक आणि एकूणच गूळ विभागातील अनागोंदी कारभाराची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करणार आहे. हे पथक गोडावून तपासणार असल्याचे सुर्यकांत पाटील यांनी सांगितले.
साखरेची सवय व्यापाऱ्यांनीच लावली
साखर मिसळल्याशिवाय व्यापारी गूळ खरेदी करत नाहीत, त्यामुळे नाईलास्तव शेतकऱ्यांना साखर मिसळावी लागते. मात्र अन्न व औषध विभागाने गुऱ्हाळघरावर छापे टाकून कारवाई केली. याला जबाबदार कोण? अशी विचारणा तानाजी आंग्रे यांनी केली.