कोल्हापूर : खिडकीचे गज वाकवून चोरी करणा-या आंतरराज्य घरफोड्या आनंद सोमाण्णा सुटगण्णावार (वय २१, रा. हुक्केरी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) बुधवारी (दि. १५) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कोल्हापुरात सापळा रचून अटक केली.त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार, शाहूपुरी हद्दीतील तीन तर लक्ष्मीपुरी व कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक अशा एकूण नऊ घरफोड्या केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून ११ तोळे सोन्याचे दागिने, १२ मोबाईल व तीन डिव्हीआर असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कर्नाटकमध्ये सहा घरफोडीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, चोरीतील सोने विक्री करण्यासाठी एक जण गुजरी परिसरात बुधवारी (दि. १५) येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सापळा रचला. संशयित आनंद सुटगण्णावार हा चोरीतील सोने विक्रीकरीता आला असता आनंद सुटगण्णावार याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीमध्ये ११ तोळे सोन्याचे दागिने, १२ मोबाईल व डीव्हीआर मिळून आले. त्याने कोल्हापूर जिल्हयातील कागल, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व कळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडया केल्याची कबुली दिली. त्याला प्रथम शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहा निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक राजेंद्र सानप, युवराज आठरे, अमोल माळी व सहाय्यक फौजदार विजय कोळी, मोहन पाटील, संतोष माने, शहाजी पाटील, आप्पासाहेब पालखे, सुरेश पाटील, अमित सर्जे, राजेंद्र निगडे, अमर आडसुळे, संदीप गुरव, किरण गावडे, सुरेश पोवार, सुजय दावणे, संजय कुंभार, प्रकाश संकपाळ, संजय काशीद यांनी केली.गेल्या तीन-चार वर्षापासून आनंद सुटगण्णावार हा एकटा जाऊन दिवसा व रात्री जाऊन घरफोड्या करीत होता. त्यामुळे सध्या तरी त्याचे साथीदार कोण नसल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. -दिनकर मोहिते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर.
कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ घरफोड्या उघडकीस, सहा लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 4:11 PM