लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या राजकारणात प्रस्थापित कुटुंबे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नऊ कुटुंबांचे प्रतिनिधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. कोणी स्वत:च, तर कोणाचा मुलगा, कोणाची पत्नी आपल्या घराण्याची परंपरा पुढे चालविण्यासाठी निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. मतदारांशी असलेली नाळ, निवडून येण्यासाठीची क्षमता यांच्या जोरावर या घराण्यांनी महापालिकेवर अखंडित राजकारण केले असले, तरी भविष्यातील करिष्मा लवकरच स्पष्ट होणार आहे.
उमेदवारांना एकवेळ लोकसभेची निवडणूक सोपी जाते; पण महानगरपालिकेची निवडणूक लढविणे खूप अवघड. गल्लीबोळांतील, कॉलन्यांतील राजकारण, कार्यकर्त्यांना सांभाळणे, लोकांना प्रचाराला आणणे, मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छा पूर्ण करणे या गोष्टी कटकटीच्या असतात. त्यांवर मात करीत शहरातील नऊ कुटुंबांनी अखंडपणे राजकारणात तग धरला आहे. विशेष म्हणजे ही घराणी प्रत्येक महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात असतातच.
काहीही आरक्षण पडले की यांचे उमेदवार ठरलेले असतात. पत्त्यातील पाने जशी बाहेर काढावीत, तसे या घराण्यांतून उमेदवार बाहेर येतात, निवडणूक लढवितात आणि जिंकतातसुद्धा! बाबू फरास, प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार, भूपाल शेटे, सुभाष बुचडे, शिवाजी कवाळे, ईश्वर परमार, मुरलीधर जाधव, सचिन खेडकर यांची घराणी महापालिकेच्या राजकारणात नशीबवान ठरली आहेत.
फरास कुटुंबीय
बाबू फरास यांचे वडील हारुण फरास नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष होते. त्यांचाच वारसा बाबू फरास यांनी पुढे चालविला व ते स्वत: तीन वेळा महापालिकेवर निवडून आले. त्यांचे चिरंजीव आदिल, पत्नी हसिना निवडून गेल्या. एवढेच नव्हे, तर बाबू फरास, हसिना फरास महापौर झाले. आदिल हे स्थायी सभापती झाले. आता पुन्हा आदिल व हसिना निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत.
चव्हाण कुटुंबीय
प्रल्हाद चव्हाण स्वत: चार वेळा जिंकले. ते नगरपालिकेत प्रथम निवडून गेले होते. त्यानंतर महापालिकेवर तीन वेळा निवडून गेले. त्यांचे पुत्र सागर, सचिन व सून जयश्री या नगरसेवक झाल्या. विशेष म्हणजे प्रल्हाद चव्हाण व सागर चव्हाण यांना महापौर होण्याचा, तर सचिन चव्हाण यांना स्थायी समितीचे सभापती होण्याचा मान मिळाला.
कवाळे कुटुंबीय
शिवाजी कवाळे एकदाच महापालिकेवर निवडून गेले; परंतु त्यांच्या पत्नी कांचन दोन वेळा, सून कादंबरी व मुलगा संदीप एक वेळ निवडून गेले. त्यांपैकी कांचन व कादंबरी महापौर झाल्या, तर संदीप स्थायी समितीचे सभापती झाले.
बुचडे कुटुंबीय
सुभाष बुचडे दोन वेळा विजयी झाले, तर त्यांच्या पत्नी वंदना एकवेळ. भावजय मनीषा दोन वेळा विजयी झाल्या. सुभाष व मनीषा यांनी परिवहन सभापतिपद, तर वंदना यांनी महापौरपद भूषविले आहे.
खेडेकर कुटुंबीय
आनंदराव खेडेकर व त्यांच्या पत्नी मालती, मुलगा सचिन प्रत्येकी एकदा, तर त्यांच्या सून अनुराधा दोन वेळा विजयी झाल्या. २५ वर्षे त्यांना गुलाल कायम आहे. सचिन उपमहापौर, तर अनुराधा महिला बालकल्याण सभापती झाल्या आहेत.
जाधव कुटुंबीय
मुरलीधर जाधव दोन वेळा, तर त्यांचे बंधू दीपक जाधव दोन वेळा विजयी झाले. दीपक जाधव महापौर, तर मुरलीधर स्थायी सभापती झाले. आता याच घरातील दोन सदस्य दोन प्रभागांतून निवडणूक लढविणार आहेत.
शेटे कुटुंबीय
भूपाल शेटे यांनी तीन वेळा महापालिकेची निवडणूक जिंकली, तर त्यांच्या पत्नी शशिकला एकदा विजयी झाल्या. भूपाल शेटे उपमहापाैर, स्थायी व परिवहन सभापती झाले आहेत. आता पुन्हा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
कमनशिबी परमार कुटुंबीय
परमार कुटुंबीय २० वर्षे महापालिकेत प्रतिनिधित्व करीत आहे. नयना, रणजित परमार यांनी प्रत्येकी एक वेळ, तर ईश्वर यांनी दोन वेळा निवडणूक जिंकली; पण दुर्दैवाने त्यांना सत्तेचे एकही पद आतापर्यंत मिळालेले नाही. नयना परमार पुन्हा निवडणूक लढविणार आहेत.