लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी गर्भवती महिलांना देण्यात येणाऱ्या अंड्यांच्या ठेकेदारीमध्ये पैसे मागितल्याचे स्टिंग ऑपरेशन उघडकीस आले आहे. यामुळे निपाणी मतदारसंघाची नाचक्की झाली आहे. त्यांच्या या कृत्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केली.
शुक्रवारी दिवसभर कन्नड वृत्तवाहिन्यांमध्ये मंत्री जोल्ले यांनी अंड्यांचे कॉन्टॅक्ट देण्यासाठी ठेकेदाराकडून २५ लाख रुपये घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. त्यानंतर याची सोशल मीडियातून जोरदार चर्चा सुरू होती. शनिवारी सकाळी निपाणी येथे मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विरोधात मोर्चा काढून मानवी साखळी करण्यात आली. यावेळी काकासाहेब पाटील बोलत होते.
ते म्हणाले की, गर्भवती महिला व बालकांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून त्यांना सरकार अंडी देत असते. गर्भवती महिलांना देण्यात येणाऱ्या अंड्यात एक महिला मंत्र्याने भ्रष्टाचार करावा ही किती निषेधार्ह गोष्ट आहे.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी म्हणाले की, ना खाऊंगा ना खाने दुंगा असे सांगणाऱ्या भाजप पक्षात भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. पैसे वाटून निवडून आल्याने मंत्री जोल्ले भ्रमात आहेत, पण त्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडणे आता गरजेचे आहे. नगरपालिका ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत पायी मोर्चा काढून छत्रपती संभाजी राजे चौकात मानवी साखळी करून मंत्री जोले यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेविका अनिता पठाडे, शेरू बडेघर,जसराज गिरे, संजय पावले, दीपक सावंत, अनिस मुल्ला, दिलीप पठाडे, धनाजी चव्हाण, निकू पाटील यांच्यासह नगरसेवक, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.