शिरोळ : व्याजाने घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावून, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रसाद अजित कुलकर्णी (वय ४४, रा. सोलापूर) व अनिल सर्जेराव करडे (५२, रा. बारामती) या दोघांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सचिन जनार्दन कागलकर (३६, रा. नृसिंहवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सचिन कागलकर यांनी प्रसाद कुलकर्णी याच्याकडून व्याजाने एक लाख रुपये घेतले होते. कुलकर्णीने व्याजापोटी २0 हजार रुपये कमी करून ऐंशी हजार रुपये कागलकर यांना दिले होते. यावेळी दोन धनादेश, कोरा मुद्रांक कागलकर यांच्याकडून घेतला होता. ही रक्कम फेडूनही दिलेल्या धनादेशावर रक्कम लिहून कुलकर्णीने बॅँकेत जमा केला. रक्कम नसल्यामुळे चेक परत गेला. यामुळे कुलकर्णीने चेक बाऊन्सची तक्रार दाखल करून कागलकरांकडून दोन लाख ७० हजार रुपये द्यावेत, असा तगादा लावला. अनिल करडे हाही कुलकर्णीला मदत करीत होता. दोघांनी मिळून कागलकर यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक फौजदार चळचूक करीत आहेत.
नृसिंहवाडीच्या एकास ठार मारण्याची धमकी दोघेजण गजाआड; सावकारकीचा गुन्हा दाखल
By admin | Published: May 14, 2014 12:40 AM