कोल्हापूर : पहाटे साडेपाचचा ठोका चुकेल मात्र, आप्पासाहेब वणिरे यांचे तळ्याकडे अर्थात गांधी मैदानात जाणे कधी चुकले नाही. प्रथम वार्मअप, खेळाडू कुठल्या स्थानावर योग्य आहे, याची पारख होती. त्यामुळे हजारो फुटबाॅल खेळाडूंना विनामानधन घडविले. त्यामुळेच सोमवारी सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता कळताच कोल्हापूरच्या फुटबाॅल वर्तुळात शोककळा पसरली.
आप्पासाहेब यांना फुटबाॅलची आवड त्यांचे बंधू बाळकृष्ण यांच्यामुळे लागली. मुळातच खंडोबा तालमीशेजारी शिवाजीपेठेत घर असल्यामुळे कुस्ती आणि फुटबाॅल हे दोन खेळच वणिरे कुटुंबाच्या रक्तात भिनलेले. त्याचा फायदा धाकट्या आप्पासाहेबांना झाला. वडीलबंधू १९४२ साली सैन्यात गेले. त्यानंतर आप्पासाहेबांनी फुटबाॅल खेळण्यास सुरुवात केली. त्यांच्या उमेदीच्या काळात १९४५ ते १९५५ या कालावधीत फुटबाॅल खेळाडू म्हणून वणिरे यांनी शिवाजी तरुण मंडळ, सरदार तालीम मंडळ, सिद्धेश्वर प्रिंटिंग प्रेस, फुटबाॅल संघ, महाकाली तालीम संघ, या संघांतून आघाडीचा खेळाडू म्हणून अनेक खेळी शाहू स्टेडियम, गांधी मैदान, पेटाळा, पुणे, मुंबई आदी ठिकाणे गाजवली. फुटबाॅल प्रशिक्षक म्हणून १९७१ ते १९९० पर्यंत काम केले. महाराष्ट्र हायस्कूलने या काळात जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय शालेय फुटबाॅल, व्हाॅलीबाॅल, बास्केटबाॅल आदींमध्ये विजेतेपद कायम राखले. त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव अभिजीत वणिरे यांनी तसाच पुढे सुरू ठेवला आहे. तेही खेळाडू, प्रशिक्षक आणि एका महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहेत.
हे नामवंत खेळाडू घडविले
गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, उमेश चोरगे, बाबूराव घाटगे, मंगल शिंदे, भाऊ सरनाईक, सुरेश पाटील, लालासाहेब गायकवाड, संभाजी जांभळे (बंधू), विलास शिंदे, बाळ जाधव, उमेश सरनाईक, पप्पू नलवडे, साठे बंधू, भाऊ सुतार, चंद्रकांत साळोखे, नेताजी गाडगीळ, अमर सासने, विवेक पोवार, विकास पाटील आदी शेकडो नामांकित फुटबाॅलपटू कोल्हापूरच्या फुटबाॅलला दिले.
पंचगिरीतही उत्कृष्ट कामगिरी
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर १९७२ ते १९८७ पर्यंत शाहू स्टेडियममधील केळवकर लीगसह राज्यातील बहुतांशी नामांकित सर्व फुटबाॅल स्पर्धांकरिता रणजित नलवडे, प्रभाकर मगदुम, निशिकांत मंडलिक, हांजाप्पा औरसंगे, जयसिंग खाडेकर, जनार्दन सूर्यवंशी, अरुण नरके, संभाजी पाटील-मांगाेरे, शरद मंडलिक, दिलीप कोठावळे आदींबरोबर पंचगिरीही केली.
‘सिद्धेश्वर’चा १९५१चा संघ
१९५१ साली संपूर्ण फुटबाॅल हंगाम विजयी ठरलेल्या सिद्धेश्वर संघात रंगराव इंगवले, आप्पासाहेब वणिरे, मानसिंग हराळे, अर्जुन पाटील, शामराव भोसले, पंडित जाधव, पांडुरंग साळोखे, आत्माराम ठकार, बा. ना. ठकार (मालक), शंकरराव जाधव, राम ठकार, पाटणकर, पुरुषोत्तम व पद्मजा ठकार यांचा समावेश होता..
कोट
एकेकाळी फुटबाॅल म्हटले की, पेठेसह कोल्हापूरच्या फुटबाॅलवर वणिरेसरांचा दबदबा होता. स्वच्छ, पारदर्शक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक, प्रशिक्षक म्हणून सर्वत्र ख्याती होती. आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे सबकुछ फुटबाॅल असेच त्यांचे घराणे राहिले.
- अरुण नरके, ज्येष्ठ फुटबाॅल प्रशिक्षक व गोकुळचे ज्येष्ठ संचालक
फोटो : ०५०४२०२१-कोल-वणिरे
ओळी : १९५१ सालचा फुटबाॅल हंगाम गाजविणाऱ्या सिद्धेश्वर प्रिंटिंग प्रेस फुटबाॅल संघात उभे (डावी) बाजू रंगराव इंगवले, आप्पासाहेब वणिरे, मानसिंग हराळे आदी खेळाडू उपस्थित होते.