हुपरी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येथील व्हिगर क्लब प्रणीत स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानामध्ये इचलकरंजीच्या प्रकाश आवाडे अकादमीच्या संदीप वाळकुंजे याने अकलूजच्या नितीन कैचे याला ढाक डावावर चितपट करून प्रथम क्रमांकाची मानाची कुस्ती सहजरीत्या जिंकली. त्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.कुस्ती मैदानाचे उद्घाटन श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, माजी सरपंच दौलतराव पाटील, उद्योगपती निरंजन शेटे, अण्णासाहेब शेंडूरे, यशवंतराव पाटील, अजित सुतार, महापौर केसरी अमृता भोसले, संग्राम वार्इंगडे, अनिल पाटील, देवाप्पा मुधाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.संदीप वाळकुंजे व नितीन कैचे यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती नानासाहेब गाठ, किरण कांबळे, निरंजन शेटे, दौलतराव पाटील, आदींच्या हस्ते लावण्यात आली. संदीप वाळकुंजे याने ढाक मारून नितीन कैचे याला चितपट करुन अस्मान दाखविले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती मोतिबागचा राजाराम यमगर व पुण्याचा राहुल भांडवले यांच्यामध्ये लावण्यात आली. मोतिबागच्या यमगरने उल्टीपुट्टी डावावर राहुल भांडवले याच्यावर विजय मिळविला. तसेच प्रकाश आवाडे अॅकडमीच्या प्रकाश नरुटे व मोतिबागच्या कपिल सलगर यांच्यातील तिसऱ्या क्रमाकांची कुस्ती बराच वेळ रेंगाळल्याने ही कुस्ती गुणावर खेळविण्यात आली. यामध्ये प्रकाश नरुटे याला गुणावर विजयी घोषित करण्यात आले. मैदानातील अन्य विजते असे : सर्जेराव मुधाळे, रामा कांबळे, शहाजी हांडे, अवधूत गोंधळी, शाहरूख मुजावर, अमित काकडे, ज्ञानेश्वर हांडे, किरण पाटील, चेतन सोनटक्के, राजेश नारनोळे, अभिजित कणिरे, विनायक उमळे, शिवकुमार घाटगे, नाना काटकर. यावेळी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
संदीप वाळकुंजेकडून नितीन कैचे चितपट
By admin | Published: April 28, 2015 10:26 PM