विश्वास पाटीलकोल्हापूर : सामाजिक कामासाठी ट्रस्टला कोट्यवधी रुपयांची देणगी देण्याचे आमिष दाखवले, त्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रभावाचा वापर करून निवारा टेस्टामेंटरी ट्रस्ट ॲन्ड एनजीओने पैसे गोळा केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. परंतू आता त्यांच्या ट्रस्टला तर फक्त डोनेशन लेटरच मिळाले आणि लोकांनी मात्र भरलेले पैसे बुडाले, अशी स्थिती निर्माण झाली आहे.कोल्हापुरातील शाहूपुरीत एक चांगले काम करणारा सामाजिक ट्रस्ट आहे. त्यावरील ट्रस्टीही वकील, डॉक्टर अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर. त्या ट्रस्टतर्फे शिरोळ तालुक्यात स्पर्धा परीक्षा केंद्र चालवले जाते. आयुर्वेदिक दवाखान्याचेही बांधकाम सुरू आहे. ट्रस्टचे उपक्रम चांगले असल्याने आणि त्याचे प्रमुख असलेल्या स्वामीजींवर समाजाचा मोठा विश्र्वास असल्याने ट्रस्टला समाजातूनच चांगली मदत होते.त्या ट्रस्टला निवारा ट्रस्टचे पदाधिकारी ॲड. भरत श्रीपाल गाट यांच्यामार्फत भेटले. या ट्रस्टला ८५ कोटी रुपयांचे डोनेशन देतो, असे सांगण्यात आले. त्यानुसार २३ जुलै २०२२ ला निवाराने त्या ट्रस्टला तसे लेखी पत्र दिले. निवाराकडे एवढी रक्कम असेल, तर ती त्याचदिवशी बँकेला सांगून धनादेशाद्वारे हस्तांतर करायला हवी होती, परंतू तसे केलेले नाही. त्यांना फक्त डोनेशन पत्र दिले आणि एप्रिल २०२३ मध्ये ही रक्कम खात्यावर जमा होईल, अशी ठेवपावती दिली. प्रत्यक्षात ही रक्कम जमाच झालेली नाही.दुसऱ्या एका प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या संगोपनाचे काम करणाऱ्या एका ट्रस्टला निवाराने २३ जुलै २०२२ लाच २० कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्र व मुदतबंद ठेव पावती दिली. ठेवपावती पाहूनच या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना शंका उपस्थित झाली. एवढे पैसे इतक्या सहजपणे हा ट्रस्ट कसा काय वाटतो, अशी शंका आली. एका पदाधिकाऱ्याने हे पत्र व पावती घेऊन आयडीबीआय बँकेची पुण्यातील लोकमान्यनगर शाखा गाठली. तिथे ही पावती दाखवून निवारा ट्रस्टच्या व्यवहाराबाबत माहिती घेतली. बँकेने या ट्रस्टचे कोणतेही खातेच आमच्या शाखेत नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्यावर निवाराचा बोगसपणा उघडकीस आला.
असा करून घेतला फायदा...या दोन्ही ट्रस्टला निवाराकडून एकही रुपयाची मदत झाली नाही. परंतू त्यातून निवाराचा मात्र मोठा फायदा झाला. तो असा की, या ट्रस्टला निधीचे पत्र देत असल्याचे मान्यवरांसोबतचे फोटो निवाराने व्हायरल केले. शाहूपुरीतील ट्रस्टचे प्रमुख असलेल्या स्वामीजींचा समाजात प्रचंड दबदबा. त्यांना सांगून ३९०० रुपये भरण्याचे आवाहन करण्यात आले. थेट स्वामीजी सांगतात म्हटल्यावर लोकांनीही या ट्रस्टकडे पैसे भरले आहेत आणि आता त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.