कोल्हापूर : प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे महापालिकेचे प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील संबंध प्रचंड ताणले आहेत. विविध प्रश्नांबाबत प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात चर्चेवेळी रविवारी वाद निर्माण झाल्याने आज, सोमवारी सकाळपासून महानगरपालिका कर्मचारी संघटनेने एकदिवसीय लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. तशी घोषणा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी केली. कोल्हापूर महानगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांना वेठबिगार पद्धतीने राबवून घेणे, प्रचलित कामकाजामध्ये परस्पर बदल करून चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांमधील शिपाई, मुकादम, कामगार यांना तृतीय श्रेणीतील काम देऊन औद्योगिक कलह कायद्याचा भंग करणे, बायोमेट्रिक पद्धतीमधील तांत्रिक दोषांमुळे कामगारांची गैरहजेरी होणे, मीटर रीडरना तास पद्धतीने काम देणे अशा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कर्मचारी संतप्त झाले होते. त्याबाबत गेल्याच महिन्यात कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारला होता; पण त्यानंतर प्रशासन आणि कर्मचारी संघटनेत झालेल्या चर्चेनंतर संप स्थगित करण्यात आला होता; पण महिनाभरात प्रशासनाच्या धोरणामध्ये बदल झाला नसल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाची तयारी केली. प्रशासन, कर्मचारी बैठकीत वाद संपाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी महापालिकेच्या ताराराणी गार्डनमधील निवडणूक कार्यालयात आयुक्त पी. शिवशंकर आणि महापलिका कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. त्यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी, कायद्याच्या तरतुदीप्रमाणे नियमांचे पालन करून महापालिकेतील कामकाज व्हावे, कर्मचारी हुकुमशाही पद्धतीने कामकाज मान्य करणार नाहीत, आयडीए (इंडस्ट्रिअल डिस्प्युट अॅक्ट) हा कायदा महापलिकेला लागू असल्याने त्यातील कायद्याच्या तरतुदींचे तंतोतंत पालन करावे, असे सांगितले. त्यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी, आम्ही कायद्याच्या अधीन राहून प्रशासन चालवीत असल्याचे सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांची बदली, कारवाईचे मला अधिकार असल्याचे सांगितले. चर्चेवेळी प्रशासन आणि कर्मचारी दोन्हीही आपापल्या मतांवर ठाम राहिल्याने चर्चा फिसकटली. त्यानंतर सर्व कर्मचारी बैठकीतून उठून बाहेर निघून गेले. त्यानंतर कर्मचारी संघाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची बैठक होऊन त्यांनी बेमुदत संपाची घोषणा केली. प्रशासनाशी चर्चेवेळी संघटनेचे अध्यक्ष रमेश देसाई, सचिव दिनकर आवटे, अजित तिवले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, बाबूराव ओतारी, रमेश पोवार, श्रीकांत रुईकर, धनंजय खिलारे, सिकंदर सोनुर्ले, अनिल साळोखे, आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. संप बेकायदेशीर; कारवाई करणार : आयुक्त कर्मचारी संघटनेने चुकीच्या पद्धतीने संपाची नोटीस बजावली आहे. वारंवार गैरहजर राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याला निलंबित केले. त्याच्या पाठीशी कर्मचारी संघटनेने राहणे चुकीचे आहे. आज, सोमवारी कर्मचाऱ्यांनी संप केल्यास तो बेकायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) अंतर्गत हा संप बेकायदेशीर ठरविणार असून त्याबाबत राज्य शासनाला पत्र पाठविणार आहे, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महापालिकेत एकत्र कर्मचारी संघटनेने संपाची हाक दिली असली तरी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, सोमवारी सकाळी नऊ वाजता सर्व कर्मचारी काम बंद ठेवून महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात एकत्र येणार आहेत. आंदोलनात सहभाग हद्दवाढीच्या मागणीसाठी आज, सोमवारी सकाळी दसरा चौकात सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनातही कर्मचारी सहभागी होत आहेत. कर्मचाऱ्यांबाबत प्रशासनाची भूमिका आडमुठी आहे. कारण नसताना कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत संताप वाढत आहे. प्रशासन आपल्या भूमिकेत बदल करीत नसल्याने नाइलाजास्तव संप करणे भाग पडले आहे. - रमेश देसाई, अध्यक्ष, मनपा कर्मचारी संघटना.
मनपा कर्मचारी आज संपावर
By admin | Published: August 22, 2016 12:26 AM