कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक साधने घेण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाला ६१ कोटींचा निधी लागणार असून, त्याच्या मागणीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव दिला आहे. याआधी नियोजन मंडळाने आयसोलेशन रुग्णालयातील ऑक्सिजननिर्मितीसाठी ८० लाखांचा निधी देण्याचे मान्य केले आहे.
गतवर्षी महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जिल्हा परिषदेकडून, तसेच लोकसहभागातून अत्यावश्यक साधने उपलब्ध केली होती. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे अनेक दानशूर लोकांनी त्यावेळी अनेक प्रकारचे साहित्य घेऊन दिले होते. पंधरा हजार लिटर हायपोक्लोराइडसह रुग्णालयाला बेड, कॉट, मास्क, पीपीई किट, असे साहित्य देण्यात आले होते. औषधांचा साठा जिल्हा परिषदेने दिला होता;
परंतु आता जिल्हा परिषदेकडून, तसेच जिल्हा प्रशासनाकडून कसलीच मदत होणार नाही. त्या त्या संस्थांनी त्यांच्या फंडातून खरेदी करावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला पुढील वर्षभरासाठी साधारण ६१ कोटींचा निधी लागणार आहे. म्हणून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे. नियोजन मंडळातून ८० लाख रुपयांचा निधी या आधीच देण्याचे मान्य केले आहे. त्यातून २०० बेडसाठी लागणारा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, पाइपलाइनची कामे केली जाणार आहेत.