कोल्हापूर : महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दोन दिवसांत सात ते आठ माजी नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बुधवारी रात्री मोजक्या कार्यकर्त्यांचीही बैठक घेतली.महापालिकेची मागची निवडणूक थोड्या जागांमुळे हरलेल्या भाजपने यावेळी मात्र मोठी तयारी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील दोन दिवसांपासून कोल्हापुरात आहेत. बऱ्याच दिवसांनी ते आले असल्यामुळे त्यांनी अनेक कार्यकर्त्यांशी भेटून चर्चा केली. महानगरपालिकेचे माजी नगरसेवक यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा फंडाही त्यांनी अवलंबला आहे.बुधवारी सकाळी त्यांनी स्थायी समितीचे माजी सभापती आशिष ढवळे व उमा इंगळे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते. सायंकाळी त्यांनी सुनंदा मोहिते यांच्या घरी भेट दिली.
या भेटीदरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षाच्या माजी नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात किती कामे केली, त्यावर किती निधी खर्च झाला, कोणत्या नावीन्यपूर्ण योजना राबविल्या, प्रभागात काम करताना कोणत्या अडचणी आल्या, याची माहिती घेतली.संभाजी जाधव भाजपकडून अशक्यमाजी नगरसेवक संभाजी जाधव तसेच जयश्री जाधव याही भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. संभाजी जाधव यावेळीही निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. त्यांचे बंधू चंद्रकांत जाधव आता कॉग्रेसचे आमदार असल्याने ते भाजपकडून लढण्याची शक्यता नाही.कॉग्रेस-राष्ट्रवादी गोटात शांतताएकीकडे भाजप निवडणुकीच्या दृष्टीने गाठीभेटी, बैठका घेत असताना दुसरीकडे कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षांत शांतता आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी आम्ही सगळे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या तयारीत असून त्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू करणार असल्याचे सांगितले.
कॉग्रेसचे महापालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख यांनी अजून कसलीच तयारी सुरू नसल्याचे सांगितले. प्रभागनिश्चिती, आरक्षण काय राहणार ते एकदा स्पष्ट झाले की वेग येईल. बाकी निवडणुकीसाठी तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.