इंदुमती गणेश
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत मतदारराजासाठी जेवणावळी उठल्या, मिसळ पावच्या कटाने ढेकर दिला, बावड्यात मतदानाला लागतात तशा किराणा दुकानांसमोर रांगा लागल्या, एक ते तीन हजारपर्यंतची पाकिटे घरपोहोच झाली; पण आम्ही नाही पाहिले अशी आचारसंहिता, भरारी पथक, निरीक्षक पथकांची स्थिती राहिली.
मतदानासाठी एक रात्र राहिली असताना मतदारसंघातल्या कुटुंबांना पक्षांकडून ठरावीक रक्कम पोहोच झाली, पंगतीच्या पंगती उठल्या. आचारसंहितेची पुरती वाट लागली तरी भरारी पथकाकडून एकावरही कारवाई झालेली नाही. शेवटच्या दिवशी जे काही गुन्हे दाखल झाले त्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांनीच सापळे रचून पकडले होते, पथकाने फिर्यादीची भूमिका बजावली.
निवडणुकीत ईडीची धमकी दाखवण्यापासून ते पाकिटे-आमिषांची घोषणाबाजी झाली. मताला १ ते ३ हजार रुपयांपर्यंतचा दर निघाला. सोमवारी सगळ्या मतदारांच्या घरी पाकिटं पोहोच झाली आहेत. कधीही न पाहिलेली माणसं आपल्या घरात माणसं किती, किती जणांचे मतदान आहे हे विचारून प्रत्येकी पाकिटे देऊन मिनिटात निघून गेली.
प्रत्येक सभेला गर्दी करण्यासाठी माणसं बोलावली गेली, त्यांचा दिवसभराचा सगळा खर्च करण्यात आला. गेल्या दहा दिवसांत जेवणावळी तर रोजच होती. पेठांमध्ये तर स्टीलच्या पिंपातून तांबडा-पांढरा रस्सा आठवडाभर वाटला जात होता. स्वत: बोलावून पंगत उठवण्याचे दिवस आता गेले. हातात एक कुपन पडले की ठरलेल्या हॉटेलमध्ये कुपन दाखवून जेवून जायचे अशीही सोय केली.
हे सगळं कोल्हापूर उत्तरमध्ये घडत असताना जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या भरारी पथकांना, स्थिर सर्वेक्षण पथकाला एकही प्रकार निदर्शनास आला नाही. एवढ्या दिवसात जेवणावळी, पाकिटं, आचारसंहितेचा भंग झालेली एकही तक्रार पथकांनी दाखल केली नाही की संबंधितांवर कारवाई केली नाही. शेवटच्या दिवशी पैसे वाटल्याबद्दल जे काही गुन्हे दाखल झाले, ते प्रकारदेखील कार्यकर्त्यांनीच उघडकीस आणले, भरारी पथकांनी फक्त फिर्यादीची भूमिका बजावली.
तुम्हीच सांगा..
निवडणुकीत काही गैर घडत असल्यास मतदारांनीच प्रशासनाकडे तक्रार करावी, मतदारच आमचे कान आणि डोळे आहेत, मग आम्ही गुन्हा दाखल करू, अशी भूमिका निवडणूक यंत्रणेने घेतली.
यंत्रणा अनभिज्ञ...
या निवडणुकीवर वॉच ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने ८ भरारी पथके, ८ स्थिर सर्वेक्षण पथके, ३ व्हिडिओ पाहणी टीम, १ व्हिडिओ सर्वेक्षण टीम अशी वेगवेगळी पथके नेमली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात नियुक्त असलेल्या यंत्रणेला एकही गैरप्रकार एवढ्या दिवसांत दिसला नाही. या पथकांनी नेमके काय काम केले हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्यावरील खर्चही वायाच गेला.