लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील वाहनांवर असलेल्या मराठी भाषेतील नंबरप्लेटवर शहर वाहतूक शाखेच्यावतीने दंडात्मक कारवाई सुरू आहे, ही कारवाई अन्यायकारक आहे त्यामुळे कारवाई करू नये, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांना देण्यात आले.
निवेदनात, मराठी क्रमांक असलेल्या मोटारसायकलवर किती व कशाप्रकारे दंड आकारण्यात यावे, याबाबत कोणताही उल्लेख माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीमध्ये नाही. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ हा राज्याने स्वीकारला नसून शाखेच्यावतीने सुरू असलेली कारवाई अन्यायकारक आहे. याबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यांमध्ये मराठी क्रमांक असलेल्या वाहनांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत, असे असतानाही कारवाई का केली जात आहे, असा सवाल विचारण्यात आला. शिष्टमंडळात अमित कुंभार, विनायक पोवार, मुकेश दायमा, राजेश व्यास, शरद बाहेती, आदींचा समावेश होता.