कोल्हापूर : अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिकाच न आल्याने अखेर नवमहाराष्ट्र सूतगिरणीच्या वाहनातून जखमीला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पोहोचविण्याची वेळ आली. मंगळवारी सायंकाळी सातच्यासुमारास साजणी येथे हा अपघात घडला.नवमहाराष्ट् सूतगिरणीसमोरच एक अल्टो कार आणि दोन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नागरिकांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकाला फोन केला. काही वेळातच पोलीस दाखल झाले. परंतु अर्धा तास झाला तरी रुग्णवाहिकेचा पत्ता नव्हता.
याचदरम्यान आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजीकडे निघाले होते. त्यांनी उतरून अपघाताची परिस्थिती पाहिली. त्यांनी आणि त्यांचे स्वीय सहायक अमोल नांदरे यांनीही रुग्णवाहिकेसाठी फोन लावून कल्पना दिली. तरीही पंधरा मिनिटे उलटल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही.
अखेर आवाडे यांनी त्यांच्या नवमहाराष्ट्र सूतगिरणीची गाडी उपलब्ध करून देऊन जखमीला त्या गाडीतून सीपीआरला पाठवून दिले. सोबत एक कामगारही दिला. अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संंबंधितांना याबाबत विचारणा करणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.