कोल्हापूर : सहकारी संस्थांचे राजकारण वेगळे आणि इतर राजकारण वेगळे. त्यामुळे ‘गोकुळ’मध्ये काहीही बदल होणार नाही. निवडणुकीवेळी काय परिस्थिती निर्माण होते, त्यावरून त्यावेळचा निर्णय घेऊ. सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने टिकल्या पाहिजेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाऊ. स्थानिक स्वराज्य संस्था मात्र महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नूतन आमदार, माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.खासदार धनंजय महाडिक हे ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर होणार असल्याचा दावा करत होते, याबद्दल विचारले असता ते म्हणाले, जे काय व्हायचे ते निवडणुकीवेळी होईल. सहकारी संस्थांचे राजकारण आणि इतर राजकारण याची गल्लत नको. आम्ही जिल्हा बॅंकेत सर्वजण एकत्रच आहोत. भाजपचे अमल महाडिक आमच्या आघाडीत आहेत आणि सतेज पाटील हे देखील आहेत. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषदेला गरज पडली म्हणून जरी स्वतंत्र लढलो, तरीही सत्ताकारणामध्ये महायुतीसोबत राहणार आहोत.
गडहिंग्लज कारखान्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी तिकडे मोळी टाकायला जाणार आहे. चार, पाच लाख टन गाळप होईल. याठिकाणी डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मनमानी पद्धतीने पैसे खर्च केले आहेत. याबाबत जी काही चौकशी व्हायची ती होईल. परंतु, गडहिंग्लज कारखाना चांगले गाळप करेल. कागलच्या विरोधी उमेदवारांनी ज्या पद्धतीने माझ्याशी वर्तणूक केली, ते मतदारांना आवडले नाही. मी आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती पुन्हा एकदा जनतेने दिली. जनता आणि ईश्वर पाठीशी असल्याने मी हे यश मिळवू शकलो. लाडकी बहीणसारख्या योजना, शेतकरी सन्मान योजना याचीही मदत झाली. मी कोणताही भेदभाव न ठेवता आरोग्यविषयक जे काम केले, त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे माझा विजय आहे.
मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी गर्दीमुश्रीफ हे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गुरूवारी शासकीय विश्रामगृहावर आले होते. त्यामुळे त्यांच्या अभिनंदनासाठी राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्यासह अनेक महिला मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी आल्या होत्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, अभय तेंडुलकर यांनीही मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही यावेळी मुश्रीफ यांचे अभिनंदन केले.