कोल्हापूर : शहरातील प्रत्येक मूल शाळेच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे, प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, एकही मूल शाळेच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहू नये, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत गठित करण्यात आलेल्या शहरस्तरीय समितीस मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. तथापि, बरीच मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसून येते. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शाळाबाह्य, स्थलांतरित मुलांची शोध मोहीम दि. १ मार्च ते १० मार्च या कालावधीत राबविण्याबाबत शासन निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण संपूर्ण शहरभर केले जाणार आहे. या
सर्वेक्षणास साथ द्यावी, असे आवाहनही बलकवडे यांनी केले.
प्रास्ताविक प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी केले. बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, प्रशासनाधिकारी शंकर यादव, डाएटचे प्राचार्य आय. सी. शेख, तहसीलदार संतोष कणसे, कामगार अधिकारी अशोक यादव, बालरक्षक संजय कडगांवे, रसूल पाटील, बाबा साळोखे, श्रावण कोकीतकर उपस्थित होते.