अतुल आंबीइचलकरंजी : खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदीमध्ये उतरून ‘नमामि पंचगंगा’ असा नारा देत नदीप्रदूषणाबद्दल आवाज उठविला. त्यापाठोपाठ आमदार प्रकाश आवाडे यांनीही नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे दाखवले. परंतु गेल्या पाच वर्षात प्रत्यक्षात नदी प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना झाल्याच नाहीत. त्यामुळे शहरवासीयांच्या उशाला नदी असताना शुद्ध व मुबलक पाण्यासाठी गावोगाव भटकावे लागत आहे. याच मुद्द्यावरून अनेक गावांमधून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी विरोधही होत आहे.पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याने इचलकरंजी शहरवासीयांनी सन २००१ साली कृष्णा पाणी योजना राबवली. ४५ दशलक्ष लिटर उपसा असलेल्या या योजनेतून सध्या ३६ द.लि. पाणी शहरामध्ये पोहोचते. त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील जुन्या सन १९६५ च्या योजनेतून नऊ ते बारा दशलक्ष लिटर पाणी मिळते. दोन्ही योजनेतून मिळणारे ४२ ते ४५ दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करून दोन ते चार दिवसाआड शहरवासीयांना पुरवले जाते. हे पाणी पुरत नसल्याने सन २०५० सालची लोकसंख्या गृहीत धरून नव्याने ६९ दशलक्ष लिटरची योजना राबविण्याचा निर्णय घेत सध्या सुळकूड-दूधगंगा योजनेतून पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु या योजनेलाही विरोध होत आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंचगंगा नदी शुद्धीकरण करून गैबी बोगद्याद्वारे येणारे काळम्मावाडीचे शुद्ध पाणी शहरासाठी घ्या अथवा जुनी कृष्णा योजना बळकट करून तेथून कृष्णेचे पाणी घ्या, असा प्रस्ताव मांडला. त्यावर कृष्णा नदीत पंचगंगा नदीचे पाणी ज्याठिकाणी मिसळते, तेथून काही अंतरावरून इचलकरंजीचे मजरेवाडी उपसा केंद्र आहे. त्यामुळे शहराला सध्या पंचगंगेचे प्रदूषित पाणी मिळत असल्याचे शहरातील प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर मुश्रीफ यांनी शिरटी येथून उपसा करण्याचा सल्ला दिला. ही माहिती समजताच शिरटीहून ही विरोध सुरू झाला.हा सर्व खटाटोप पंचगंगा नदी प्रदूषित असल्याने सुरू आहे. शहरालगत पंचगंगा नदी असताना फक्त ती प्रदूषित झाली असल्याने अन्य गावांतून दुसऱ्या नदीतील पाणी आणण्यासाठी जंग जंग पछाडावे लागत आहे. त्यात लोकप्रतिनिधींचे राजकारण घुसल्याने विरोधाला विरोध सुरू झाला आहे. या प्रदूषणाला इचलकरंजी कारणीभूत असल्याने ग्रामीण भागांतून विरोधाला जोर लागला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून योजना राबवून दुसऱ्या नदीतून पाणी आणायचे आणि ते प्रदूषित करून पंचगंगा नदीत सोडायचे आणि ग्रामीण भागातील जनतेने प्रदूषित पाणी प्यायचे हा प्रकार योग्य नाही, अशी भावनाही ग्रामीण भागांतून व्यक्त होते.जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पंचगंगाा नदी शुद्धीकरणासाठी एकत्रित आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास नदी प्रदूषण रोखणे शक्य आहे. संपूर्ण पंचगंगा नदीकाठावरील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. तसेच शेतीला आणि जनावरांनाही शुद्ध पाणी मिळेल. पण त्यासाठी राजकारण विरहित चळवळ राबवावी लागेल.
महापालिकेच्या उपाययोजनाही तोकड्यामहापालिकेने शहरातील निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर चाप लावण्यासाठी नळाला तोट्या बसवणे, यासारख्या कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणाही तोकडी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अनेकवेळा नोटिसा मिळूनही म्हणाव्या तशा हालचाली झाल्या नाहीत.
शेती व जनावरांनाही प्रदूषित पाणीपंचगंगा नदीकाठावरील शेती आणि जनावरांना प्रदूषित पाणी दिले जाते. त्यातून मिळणारे उत्पादनही प्रदूषित स्वरुपाचे मिळते. त्यातून अनेकांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. याचा फारसा गांभीर्याने विचार शासन पातळीवरही होत नाही.