लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : खेडे-मुंगूसवाडी (ता. आजरा) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच रूपाली महेश आर्दाळकर यांच्याविरोधात उपसरपंचांसह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करणे, मनमानी कारभार व सरपंचांच्या पतीचा कामकाजामध्ये होणारा हस्तक्षेप, अशी कारणे ठरावात दाखल केली आहेत.
आजरा-गडहिंग्लज मार्गावर मुंगूसवाडी तिठ्यानजीक पेट्रोल पंपाला परवानगी दिली, या मुख्य कारणावरूनच सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल झाला आहे. उपसरपंच संगीता शिंदे, सदस्य शारदा सावंत, विजय पालकर, प्रकाश चव्हाण, शोभा लकमले, ज्योती सावरतकर, श्रीपती नरके, संदीप पाटील, स्मिता गोडसे यांनी हा अविश्वास ठराव दाखल केला आहे. लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल होण्याची आजरा तालुक्यातील ही पहिलीच वेळ आहे.
* अविश्वास ठराव बैठक १५ फेब्रुवारीला
सरपंचांविरुद्ध उपसरपंचांसह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. अविश्वास ठरावाची बैठक १५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार विकास अहिर काम पाहणार आहेत.