उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्री. मंगेश्वर देवाची त्रैवार्षिक यात्रा ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. या निमित्ताने सामाजिक सलोखा राखण्याबरोबरच राजकारण विरहित गावची यात्रा पार पाडण्यात येणार असून, त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच यात्रा काळाक कोणत्याही चौकात, गल्लीत, ग्रामपंचायत हद्दीत तसेच श्री. मंगेश्वर मंदिर परिसरात एकही ‘डिजीटल’ लागणार नाही. त्यामुळे गाव डिजीटल मुक्त बनणार असून एकोप्यातून गावची एकी दाखवण्याची संकल्पना पुढे येत आहे. यात्रा काळात क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, व्हॉलिबॉल, शरीरसौष्ठव, सायकल स्पर्धा, धनगरी ओव्या, ढोलवादन, निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, महिलांसाठी घागर पळविणे, मोटारसायकल स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गाव स्वच्छ करण्याबरोबर प्लास्टिक मुक्त पर्यावरण करण्याचा गावचा संकल्प आहे. यावेळी श्री. मंगेश्वर देवालय यात्रा कमिटी स्थापन करण्यात आली. सरपंच सुरेखा चौगुले, उपसरपंच, अध्यक्ष, उपाध्यक्ष, महादेव चव्हाण (सेक्रेटरी), सभाष यादव, भाऊ चौगुले, योगेश चव्हाण, भारत अवघडे तसेच प्रत्येक प्रभागातून दहाजणांची कमिटी बनवण्यात येणार आहे.
उचगावच्या त्रैवार्षिक यात्रेत नो‘डिजीटल’
By admin | Published: March 01, 2015 10:36 PM