कोल्हापूर : गेल्या तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे. त्यासाठी येथून पुढे कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये डॉल्बी लावल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
डॉल्बीचे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे कोणत्याही समारंभात डॉल्बी लावण्यास परवानगी नाकारली जाणार आहे. निवडणुका असो किंवा राजकीय व्यक्तींचा दहीहंडीचा कार्यक्रम असो, डॉल्बी लावण्यास सक्त मनाई केली जाणार आहे.
आगामी गणेशोत्सवात डॉल्बीचा वापर करू नये, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांतील सर्व सार्वजनिक तरुण मंडळांच्या अध्यक्षांना नोटिसा पाठवून जनजागृती केली जाणार आहे. तसेच डॉल्बीसंबंधी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व सार्वजनिक तरुण मंडळांची विशेष बैठक बोलाविण्याचे आदेशही पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, असे नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
गतवर्षी नियमबाह्य डॉल्बी लावणारी सार्वजनिक मंडळे, तालीम संस्था यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर राहावे लागत आहे. मंडळातील बहुतांशी कार्यकर्ते हे तरुण आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे शैक्षणिक करिअर संपुष्टात येते. त्यामुळे त्यांची व कुटुंबाची मोठी हानी होते. या गोष्टीचा विचार करून तरुणांनी डॉल्बीपासून लांब राहून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नांगरे-पाटील यांनी केले.