कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी संतप्त सकल मराठा समाजाने, आज शुक्रवारी सकाळी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना रोखून धरले. जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत तुम्हाला कोल्हापूर शहरात प्रवेश नाही असे ठणकावून सांगत कागलातून राज्यकारभार करा असे आंदोलकांनी ठणकावले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानाही सकल मराठा समाजाच्या कार्यकत्यांनी, विशेषत: महिला आंदोलकांनी पालकमंत्र्यांची गाडी अडविली. त्यामुळे पालकमंत्र्यांना गाडीतून उतरून आंदोलकांना सामोरे जावे लागले. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात २०१४ पासून राज्य सरकारने मराठा समाजाला कसे फसविले आणि १५ ऑगस्ट २०२३ पासून पुन्हा नव्याने कसे फसवत आहे, याचा पाढाच आंदोलकांनी वाचला.पालकमंत्र्यांनी "जरा धीर धरा... मराठ्यांना आरक्षण आम्ही देणारच.." असे सांगण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक आक्रमक झाले. नुसत्या घोषणा नको, पक्की तारीख सांगा, आता शासनकर्ते आणि राज्यकर्त्याकडून समाजाला फसवू शकत नाही असे ठणकावून सांगितले. कोर्टाच्या पायरीवर टिकणारे आरक्षण मराठयांना जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पालकमंत्र्यांना कोल्हापूर शहर बंद असून त्यांनी कागलात बसून राज्यकारभार करावा असे सुनावले. आंदोलकांनी आक्रमक होऊन पुन्हा घोषणाबाजी सुरू केली म्हणून तेथे बंदोबस्ता असलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा पालकमंत्री मुश्रीफ गाडीत बसून निघून गेले. आंदोलनकर्त्यानी घोषणा सुरूच ठेवल्या, त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोडून दिले.
या आंदोलनामध्ये ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, चंद्रकांत पाटील, अमित अतिग्रे, अविनाश दिंडे, अमर निंबाळकर, निलेश लाड, श्रीकांत पाटील, महादेव पाटील, भिकाजी मंडलिक, सुनिता पाटील, सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी, छाया जाधव, पुजा पाटील, भारती दिवसे, मयूर पाटील यांनी भाग घेतला.