कोल्हापूर : राज्यात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दिवसेंदिवस होणाऱ्या हल्ल्याची दखल घेऊन येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) आज, मंगळवारपासून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जादा पोलिस बंदोबस्त देण्याचेही पोलिस प्रशासनाने मान्य केले असल्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता कार्यालयात अभ्यागत समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात पोलिस दलाकडून २४ तास पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले. सीपीआरमधील १४ अतिक्रमणे एक एप्रिलपर्यंत काढून टाकावीत. ही अतिक्रमण कारवाई थांबविण्याबाबत मंत्रीच काय, अगदी मुख्यमंत्री महोदयांचा जरी फोन आला तरी ही कारवाई थांबवू नका. ती तुम्ही थांबवली तर मी तुमच्यावरच कारवाई करणार असा सज्जड दमच दादांनी प्रशासनाला दिला. बैठकीस आमदार अमल महाडिक, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, सीपीआरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. सुरेखा बसरगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, अभ्यागत समितीचे महेश जाधव, सुभाष रामुगडे, डॉ. अजित लोकरे, डॉ. इंद्रजित काटकर, राजीव गांधी योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ‘आता रुग्णाबरोबर दोनच नातेवाइकांना सीपीआरमध्ये प्रवेश दिला जाईल. त्याला प्रवेशद्वाराजवळ थांबविले जाईल व कोणत्याही प्रकारचे वाहन आत सोडले जाणार नाही. येथील अतिक्रमण २ एप्रिलच्या आत स्वत:हून काढून घ्यावे, अन्यथा प्रशासन अतिक्रमण काढेल. यावेळी समिती सदस्य सुनील करंबे म्हणाले, बेघर रुग्णांचे योग्य ते पुनर्वसन व्हावे. अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी. ड्रेनेज सिस्टीम कार्यरत नसल्याने अस्वच्छ पाणी व दुर्गंधी पसरते. त्याची सोय व्हावी.डॉ. रामानंद म्हणाले, सीपीआरमध्ये एका रुग्णाबरोबर दोनच नातेवाइकांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे; पण त्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त पाहिजे व रुग्णांच्या नातेवाइकांना प्रवेशपास देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे. तसेच रिक्त पदे भरलेली नाहीत ती त्वरित भरावी. शेंडा पार्कमधील महाविद्यालयासाठी सुमारे सहा कोटी मंजूर झाले आहेत. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी, पोलिस अधीक्षक तांबडे यांच्याशी बोलून जादा पोलिस बंदोबस्त देऊ व अतिक्रमणासाठी लागणाराही पोलिस फौजफाटा देऊ, असे सांगितले. (प्रतिनिधी)गिरीष महाजन २०ला सीपीआरमध्ये..सीपीआरमध्ये सीटी स्कॅन मशीन व ट्रामा केअर सेंटरच्या उद्घाटनासाठी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सर्वांशी संवाद साधण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन हे २० एप्रिलला कोल्हापुरात येतील, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
सीपीआरमध्ये वाहनांना नो एंट्री
By admin | Published: March 27, 2017 11:53 PM