लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेली ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे धोकादायक ठरू शकतात; कारण यातील एकाही आरोग्य केंद्रामध्ये ना अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे; ना विविध उपकरणांची देखभाल केली जात आहे. भंडारा येथील बालक मृत्यू दुर्घटनेनंतर मात्र सर्वजण जागे झाले असून आता याबाबत सूचना देण्याचे काम सुरू आहे.
भंडारा येथील दुर्घटनेनंतर सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या ठिकाणी प्रसूतीही केल्या जातात. मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील रुग्णांची येथे ये-जा असते. मात्र येथे एकाही आरोग्य केंद्रामध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
या ठिकाणी स्वच्छतेसाठी लागणाऱ्या रसायनांपासून ते विविध औषधांपर्यंत, इंजेक्शन्स आणि बॅन्डेजसाठी लागणाऱ्या कापसापर्यंत अनेक ज्वलनशील वस्तू आणि रसायने असतात. त्यामुळे चुकून एखादी आग लागण्याची दुर्घटना घडली; तर मात्र ते अनेकांच्या जिवावर बेतू शकते. आतापर्यंत या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कधीच फायर ऑडिट करण्याचे शासनालाही सुचले नाही. मात्र भंडाऱ्याच्या दुर्घटनेनंतर याबाबतचे भराभर आदेश निघाले आहेत.
चौकट
जिल्ह्यातील तालुकावार प्राथमिक आरोग्य केंद्रे
अ. न. तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या
१ आजरा ४
२ भुदरगड ५
३ चंदगड ६
४ गडहिंग्लज ६
५ गगनबावडा २
६ कागल ५
७ करवीर ९
८ पन्हाळा ७
९ राधानगरी ६
१० शाहूवाडी ९
११ हातकणंगले ९
१२ शिरोळ ८
एकूण ७७
चौकट
कोल्हापूर महापालिकेला पत्र
जिल्ह्यातील या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट करून घेण्यासाठी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. सर्वसाधारणपणे ५०० ते १००० चौरस फुटांच्या इमारतींसाठी फायर ऑडिटसाठी किती खर्च येणार आहे अशी विचारणा या पत्रातून करण्यात आली आहे. खर्चाचे अंदाजपत्रक करून मग त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र आता शासन आदेशानुसार याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या सर्व केंद्रांमधील आरोग्य उपकरणे सुस्थितीत आहेत की नाही याची तपासणी आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या यंत्रणेकडून करून घेण्यात येणार आहे. दुर्घटना होऊच नये यासाठीची सर्व पातळ्यांवरील दक्षता घेण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्याधिकारी
फोटो नंतर पाठवून देत आहे.