कोल्हापूर : सार्वजनिक जीवनात सर्वांत मोठा वाटा असलेल्या एसटीच्या खर्चात रोज तीन ते साडेतीन कोटीची तूट येत आहे. विविध प्रकारच्या सवलती जाहीर करून फक्त लोकप्रियता मिळविण्यासाठी एसटीचा वापर केला जात आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनात सरकारने एसटीसाठी एका पैशाचीही मदत केली नाही, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला.महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि भव्य कामगार मेळावा रविवारी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत पार पडला. त्यावेळी बरगे बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष शेखर कोठावळे होते.बरगे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली तेव्हापासून म्हणजे एप्रिल २०२०पासूनचा फरक देण्यासाठी सरकारला ३,१०० कोटींची गरज आहे. शिवाय १०० कोटींचा महागाई भत्ता प्रलंबित आहे. एसटीच्या ताफ्यात नवीन गाड्या येत नाहीत. तोवर स्पेअर पार्ट घ्यायला पुरेसा निधी उपलब्ध नाही. ८० टक्के गाड्या जुन्या, कालबाह्य आहेत. त्यांची वारंवार कामे निघत आहेत. परिणामी मार्गस्थ बिघाड वाढत असून, त्याचा कर्मचारीवर्गावर ताण आहे.याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष शेखर कोठावळे, सुनील घोरपडे, अरविंद पाटील, राजेंद्र पाटील, आय्याज चौगुले, मारुती पुजारी, परवेझ मोमीन, उत्तम पाटील, अनिता पाटील, श्रीनिवास कुंभार उपस्थित होते.पदाधिकारी, वाहकांचा सत्कारविभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी चालक, वाहक, यांत्रिकी यांना सन्मानाने वागवावे, चालक - वाहकांच्या रजा तसेच कामगिरीबाबत महामंडळाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला. यावेळी सेवानिवृत्तीबद्दल सुहास घोरपडे आणि श्रीधर मंगलेकर या पदाधिकाऱ्यांचा तसेच चोरीस गेलेले चौदा तोळे सोने प्रवाशांना परत करून चोरीचा छडा लावल्याबद्दल वाहक विजया राजू क्षत्रिय आणि वंदना संतोष क्षीरसागर यांचा बरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हिवाळी अधिवेशनात एसटीसाठी मदत नाही, श्रीरंग बरगे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:47 IST