विश्वास पाटीलकोल्हापूर : सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडील नोंदणी आणि परताव्याची हमी या अत्यंत परस्परविरोधी बाबी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या कंपन्या, आमची नोंदणी सेबीकडे आहे, त्यामुळे तुम्ही घाबरण्याचे कारण नाही असे जे सांगतात, ती निव्वळ थाप असल्याचे त्यावरून स्पष्ट होते. ज्यांच्या शब्दावर देशातील शेअर बाजार हलतो, ते राकेश झुनझुनवाला हे देखील कधीच परताव्याची हमी देत नाहीत.शेअर मार्केटमध्ये देशातील कोणतीच संस्था परताव्याची हमी देत नाही. तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा दिल्या जाणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट नोटवरही तसा स्पष्ट उल्लेख करणे कायद्याने बंधनकारक आहे. अशी हमी दिल्यास त्या क्षणाला कंपनीची नोंदणी सेबी रद्द करते. मग तरीही दामदुप्पट रकमेचे आमिष दाखविणाऱ्या कंपन्या ही हमी कशी देतात, याचा शोध घेतला असता काही गोष्टी स्पष्ट होतात. मल्टि कमोडीटी एक्स्चेंजकडे (एमसीएक्स) कडे दहा लाख रुपये भरल्यानंतर त्यांंचे सदस्यत्व मिळते. तो सेबी नोंदणी क्रमांक असतो. असा नोंदणी क्रमांक मिळवून व्यवहार करण्यासाठी ही कंपनी पुढे दाखवायची, प्रत्यक्षात अन्य तीन-चार कंपन्या स्थापन करून पैशाचे व्यवहार त्या कंपन्यांमार्फत करायचे.शेअर मार्केटमध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीसाठी संबंधित व्यक्ती आणि ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये तो गुंतवणूक करणार असतो, त्यांच्यातील तो करार असतो. त्यामध्ये ज्या ब्रोकर कंपनीचा कुठेच संबंध येत नाही. गुंतवणूकदार थेट कंपनीच्या नावे पैसे भरतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, तुम्ही एखाद्या बँकेत गेल्यानंतर लिपिक तुमच्याकडील पैसे घेऊन तुमच्याच खात्यावर भरतो. ब्रोकर कंपन्यांचे काम म्हणजेच त्या लिपिकाचे काम असते. परंतु या दामदुप्पट परतावा देणाऱ्या कंपन्या तुमच्याकडील पैसा घेऊन स्वत:च्या नावावर गुंतवत असल्याचे चित्र आहे. म्हणजे एसटीच्या वाहकाने दिवसभर तिकिटाचे जमलेले पैसे रात्री जाताना घरी घेऊन जाण्यातला हा प्रकार आहे.आलिशान गाड्या येतात कशा...मागच्या चार-पाच वर्षात जे सर्वसाधारण स्वरूपाची नोकरी करत होते, असे लोक या योजनेतून गबर झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी फक्त गुंतवणूकदारांची साखळी जोडून दिली, म्हणून त्यांनी मसिर्डिजसारख्या गाड्या घेतल्या आहेत. या गाडीची किंमत ७० ते ८० लाख रुपये आहे. सद्यस्थितीत वर्षभर दिवस-रात्र राबून एक हजार टन ऊस जरी कारखान्यास घातला तरी, त्या शेतकऱ्यास एवढी महागडी गाडी घेणे शक्य नाही.तू चाल पुढं गड्या..या कंपन्यांचे जे कार्यक्रम होतात, ते डोळे दीपवून टाकणारे असतात. त्यावर प्रचंड पैसा खर्च केला जातो. त्यामुळे या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांना या जगाचा मोह पडतो. कोणत्याही कष्टाशिवाय लाखो रुपयांत कमाई होते हे दिसल्यावर, लोक त्याकडे आपोआप आकर्षित होतात. या कंपन्यांचे जे व्हिडीओ आहेत, त्यामध्ये तू चाल रं पुढं गड्या तुला भीती कशाची... हे गाणे दाखविले जाते. गुंतवणूक कशी केली जाते, त्यातील रिटर्न्स कसे मिळतील याबद्दल एकही वाक्य त्यात दाखविले जात नसल्याचा अनुभव आहे.निवृत्तीनंतरचा पैसा- गडहिंग्लज तालुक्यातून गुरुवारी एका मुख्याध्यापकाचा फोन आला. त्यांच्या शाळेतून निवृत्त झालेल्या एका शिक्षकाने निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम (काही लाखांत) या योजनेत गुंतवली आहे.- हातकणंगले तालुक्यातील एका व्यक्तीने दामदुप्पटच्या आमिषाने पतसंस्थेचे कर्ज काढले आहे व त्यातील रक्कम या योजनेत गुंतवली आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकांचा असे पैसे गुंतवण्यास विरोध होता. परंतु तरीही त्यांनी ही रक्कम गुंतवली आहे. आता ही रक्कम कशी परत मिळणार, असा पेच त्यांच्यासमोर आहे.
दामदुप्पट योजना : 'ती' निव्वळ थाप, शेअर मार्केटमध्ये परताव्याची हमी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 12:20 PM