राजाराम पाटील ।इचलकरंजी : तब्बल दहा टोळ्यांना मोक्का लागूनही पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याने वस्त्रनगरी धास्तावली आहे. बहुतांशी सराईत गुंड गजाआड आहेत, तर तीन पोलिस ठाणी, उपअधीक्षक व अतिरिक्त अधीक्षकांची कार्यालये असूनसुद्धा गुन्हेगारीचा उपद्रव वाढतच आहे. अशा स्थितीत नवीन गुन्हेगारांना आवर घालण्याचे पोलिसांसमोर तगडे आव्हान आहे.
शहरामध्ये यापूर्वी दोन पोलीस ठाणी असताना शहापूर, तारदाळ, खोतवाडी, यड्राव, कोरोची अशा उत्तरेकडील ग्रामीण भागांमध्ये, पण वाढलेल्या नवीन उद्योगांच्या वसाहतींमध्ये गुन्हेगारी वाढत चालली. त्यामुळे त्या परिसरात नव्याने शहापूर पोलीस ठाण्याची निर्मिती केली. अशा स्थितीत गुन्हेगारीचे वाढते स्वरुप आणि गंभीर गुन्ह्यांचा वाढत जाणारा आलेख पाहता इचलकरंजी शहरातील एकापाठोपाठ एक याप्रमाणे तब्बल दहा टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आली. त्यापैकी एका टोळीवर दुहेरी मोक्का लागला आहे.
अशा पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांच्याकडून स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आली. स्थानिक पोलिसांबरोबरच या पथकाकडूनसुद्धा गंभीर गुन्ह्यांची दखल घेत वारंवार कारवाई केली जाते. मात्र, अद्यापही काही उद्योजक आणि विशेषत: परप्रांतीय कामगारांचा पाठलाग करून त्यांना लुटणे, चेन स्नॅचिंग, मारामारी, टोळीचे वर्चस्व गाजविण्यासाठी खुनासारखे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक देवघेवीवरून होणारे खून यांचेही स्वरुप अलीकडील काळात वाढत चालले आहे.
नव्याने गुन्हे घडण्याच्या प्रकारामध्ये नवीन तरुणांचा भरणा अधिक दिसून येत आहे. यापूर्वी कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर नोंद नसताना अचानकपणे हाफ मर्डर, मर्डरसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही तरुणांचा सहभाग दिसून येत आहे. यामध्ये अवघ्या २० ते २५ वयोगटांतील तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. ज्यामुळे वस्त्रनगरीत नवनवीन टोळ्या पुन्हा उदयास येत असल्याचे निदर्शनास येत आहे आणि यांनाच आवर घालण्याचे काम पोलिसांना करावयाचे आहे..अल्पवयीनांच्या सहभागाची चिंताखून किंवा गंभीररित्या दुखापतीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत चालला आहे. त्यामुळे ज्या परिस्थितीत नवनवीन मुले गुन्हेगारीमध्ये दाखल होत आहेत. त्याचा अभ्यास करून पोलिसांनी अशा मुलांबरोबरच त्यांच्या पालकांच्याही वर्तणुकीवर लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: स्वत:चे कामधंदे अथवा रोजगार उपलब्ध करून घेण्याच्या वयात त्यांना वाईट वळण लागत आहे. अशा स्थितीत मुलांना समुपदेशनाची गरज असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.बेरोजगारीमुळे तरुण वाममार्गाकडेवरर्षभरामध्ये तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तेरा खून, वीस खुनाचे प्रयत्न, ५२ गंभीर मारहाणे आणि वीसहून अधिक गर्दी मारामारीचे प्रकार घडले आहेत. अलीकडील तीन-चार वर्षांमध्ये वस्त्रोद्योगामध्ये असलेली मंदी आणि त्यामुळे बंद पडत चाललेले उद्योगधंदे यामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून हाताला काम नसल्याने तरुणवर्ग गुन्हेगारी जगताकडे वळत असल्याबद्दलची चर्चा शहर व परिसरात आहे.