कोल्हापूर : महिला, दलित आणि झोपडपट्टीतील सामान्य माणसांबद्दल भाजपच्या नेत्यांची वक्तव्य बघितली तर त्यांचा खरा मुखवटा उघडा पडला असून, अशा प्रवृत्तीला घरी पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. देशातील जनता महागाईमध्ये होरपळत असताना भाजपचे नेते कोठे लपून बसले आहेत? अशी विचारणा करीत चंद्रकांत पाटील तुम्ही कितीही छापे टाका हे सरकार अधिकच घट्ट होत आहे. मात्र, या निवडणुकीत शाहू विचार विरोधी भाजपला रोका, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मिरजकर तिकटी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने मिरजकर तिकटीचा परिसर खचाखच झाला होता.
जयंत पाटील म्हणाले, राेज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असताना त्यावर चर्चा होत नाही; मात्र धर्मा धर्मात तेढ निर्माण करून भावना भडकविण्याचे काम भाजप करीत आहे. तपास यंत्रणेचा वापर करून समोरच्याला नेस्तानाबूत करायचे, जे कायदे आतंगवाद्यांसाठी बनविले त्याचा वापर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर केला जात आहे. तिन्ही पक्ष एकदिलाने काम करीत असून, या निवडणुकीत भाजपची धुळधाण उडाल्याशिवाय राहणार नाही.
मंत्री बाळासाहेब थाेरात म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न बघत आहेत. त्यासाठी रोज एका नेत्यांवर छापे टाकत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे. मात्र, चंद्रकांत पाटील तुम्ही कितीही छापे टाका हे सरकार अधिकच घट्ट होत आहे. समतेचा विचार देशाला देणाऱ्या या भूमीत जयश्री जाधव यांना विजयी करून जातीयवाद्याला हद्दपार करा.
उमेदवार जयश्री जाधव म्हणाल्या, माझ्यावर दुखाचा डोंगर कोसळलेला असताना केवळ कोल्हापूरकरांच्या पाठबळावर उभी आहे. स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी साथ द्या. मी बिचारी नाही, खंबीर आहे, म्हणूनच निवडणुकीत उभी आहे.
माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, समाजात तेढ निर्माण करून मतांची पोळी भाजून घेण्याचा काहींचा प्रयत्न आहे, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. लोकशाहीची नीतीमूल्ये पायदळी तुडविणाऱ्या भाजपला जागा दाखवा.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, विजय देवणे, भारती पवार, आदिल फरास, सरलाताई पाटील, दिलीपराव जाधव, मोहन कांबळे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
आमदार पी. एन. पाटील, आमदार संग्राम थोपटे, प्रा. जयंत आसगावकर, प्रल्हाद चव्हाण, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, आर. के. पाेवार, आदी उपस्थित होते.
कितीही टीका करा संयमानेच लढणार - पालकमंत्री
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही, भाजप विरुद्ध कोल्हापूरचा स्वाभिमान अशीच होत आहे. कोल्हापूरकरांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. माझ्यावर कितीही टीका करा मी संयमानेच लढणार आहे.
काँग्रेस पक्षाने ६० वर्षांत कोल्हापूरसाठी काय केले व तुम्ही पाच वर्षे पालकमंत्री असताना काय केले, याचा लेखाजोखा मांडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात यावे. तारीख व वेळ तुम्ही द्या, असे आव्हान सतेज पाटील यांनी केले.