कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैद्यांची क्षमता १८०० असून, सध्या २२०० इतके कैदी या ठिकाणी आहेत. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात क्षमतेपेक्षा ४०० टक्के जादा कैदी आहेत. त्या तुलनेत कळंब्यात संख्या अतिरिक्त वाटत नाही. या ठिकाणी कैद्यांची देखभाल उत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र कारागृह विभागाचे पोलिस महानिरिक्षक दीपक पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.दीपक पांडे यांनी कळंबा कारागृहाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. बंद कारागृहातून खुले कारागृहासाठी कोणते कैदी पात्र आहेत हे पाहण्यासाठी खुले कारागृह उपक्रमाचा चेअरमन म्हणून आपण ही भेट दिली. खुले कारागृह उपक्रमासाठी कोणते कैदी पात्र आहेत याची माहिती घेतली. पांडे यांच्या भेटीनंतर येथील खुल्या कारागृह उपक्रमाचा मार्ग सूकर झाला आहे.कळंबा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत, याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, या कारागृहातील १८०० कैद्यांची क्षमता असून, सध्या येथे २२०० कैदी आहेत. मुंबईतील आर्थर रोड कारागृहाच्या तुलनेत हे कमी आहेत. कारण या ठिकाणी क्षमतेच्या ४०० टक्के कैदी आहेत. त्यामुळे कळंबा कारागृहातील कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असे म्हणता येणार नाही. या कारागृहातील कैद्यांची देखभाल व व्यवस्थापन उत्कृष्ट आहे.कळंबा कारागृहात ‘मोक्का’अंतर्गत कैदेत असलेल्या आरोपींना सवलत दिली जाते, तसेच काही दिवसांपूर्वी या कारागृहात मोबाईल सापडला, याबाबत विचारले असता, त्यांनी या संदर्भात आपल्याला काही माहिती नसून त्याची चौकशी ‘डीआयजी’ व ‘एडीजी करतील’ असे पांडे यांनी सांगितले.