बाबा इंदूलकर : आता मराठा समाज शांत बसणार नाही
दिलीप देसाई : आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत राज्य सरकारने दोन दिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे.
निवासराव साळोखे : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे. आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही.
अमृत भोसले : यापुढे मूक नाही, तर ठोक मोर्चा काढला जाईल.
किसन शिंदे : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे.
महेश जाधव : राज्य सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा.
सचिन तोडकर : आता आम्ही मूक मोर्चाला तिलांजली दिली असून यापुढे ठोक मोर्चा आंदोलन केले जाईल.
चौकट
आमच्या भविष्याचे काय?
हे आंदोलन संपेपर्यंत सचिन टीम टॉपर्सचे खेळाडू सिद्धवी माने, प्राजक्ता सूर्यवंशी, सानवी घोरपडे, सुमित पार्टे यांनी ‘आमच्या भविष्याचे काय?’ असा फलक हातात घेवून ताराराणी चौकात स्केटिंग केले. शाहीर मिलिंद सावंत यांनी ‘कोण म्हणतयं मिळत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही’ असा फलक आणि भगवा ध्वज सायकलीला लावून आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी ‘उठ मराठ्या जागा हो’ पोवाडा सादर केला. अडीच वर्षीय रिधीमा इंदूलकर ही बाल शिवरायांच्या, तर याज्ञनी भोसले ही जिजाऊंच्या वेशभूषेत या आंदोलनात सहभागी झाल्या.
चौकट
‘सारथी’चे उपकेंद्र तातडीने सुरू करा
राज्य सरकारने सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यासाठी नियोजन नसल्याने आता जागा शोधली जात आहे. मराठा विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्यासाठी योग्य नियोजन करून तातडीने उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी समरजित घाटगे यांनी केली. आरक्षणाच्या लढ्यात सर्वांनी आपल्या पक्षाची पायताणे बाहेर ठेवून सहभागी व्हावे. या लढ्याचे नेतृत्व समाजाने करावे. आंदोलनाची ठिणगी राज्यभर पोहोचावी, असे त्यांनी सांगितले.
चौकट
पर्यायी मार्गांनी वाहतूक वळविली
या चौकाकडे येणाऱ्या शिवाजी विद्यापीठ, तावडे हॉटेल, स्टेशन रोड, धैर्यप्रसाद हॉलकडून येणारी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांनी वळविली. त्यामुळे या पर्यायी मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. आंदोलनस्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.