जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्युदर हा देशात सर्वाधिक असल्याची दखल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली होती. त्यांच्या सूचनेनंतर बुधवारी कोल्हापूरमध्ये कोरोनाविषयक टास्क फोर्सचे सदस्य आले होते. त्यांनी सीपीआर, आयजीएम रुग्णालयांची पाहणी करून संबंधितांना काही सूचना केल्या आहेत.
या चर्चेदरम्यान काही खासगी रुग्णालये त्यांच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील कोरोनाचे रुग्ण अतिगंभीर अवस्थेत सीपीआरमध्ये पाठवतात. तशा अवस्थेत रुग्ण हलवणे धोकादायक असते. अशातच एक, दोन दिवसांत अशा रुग्णाचा मृत्यू होतो. परिणामी सीपीआरमधील मृत्यूंची संख्या वाढते असे निरीक्षण यावेळी नोंदवण्यात आले. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील अतिदक्षता विभागातील रुग्ण सीपीआरमध्ये पाठवू नयेत. जरी तसा प्रसंग आला तरी वॉररूमने रुग्णाची सर्व माहिती घेतल्यानंतर वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मग याबाबत निर्णय घ्यावा, अशाही सूचना दिल्याचे मोरे यांनी सांगितले.
चौकट
प्रकाश आबिटकर यांनी घेतला आढावा
आमदार प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी दुपारी सीपीआरला भेट देऊन आजरा, भुदरगड, राधानगरीसह इतर तालुक्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. गारगोटी येथे ऑक्सिजन बेड वाढवण्याबाबत काय नियोजन केले आहे याचीही विचारणा त्यांनी केली. लहान मुलांना संसर्ग सुरू झाला तर काय नियोजन केले आहे याचीही माहिती त्यांनी घेतली. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. अजित लोकरे यांच्यासह वरिष्ठ डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
चौकट
टास्क फोर्सच्या अहवालाची प्रतीक्षा
बुधवारी येऊन गेलेल्या टास्क फोर्सच्या अहवालाची प्रतीक्षा आता लागून राहिली आहे. कोरोनाविषयक नेमक्या उपचारप्रणालीचा वापर, जादा मनुष्यबळाची गरज, औषधांचा पुरवठा या मुद्द्यांवर टास्क फोर्सच्या सदस्यांनी निरीक्षण नोंदवले असले तरी लेखी अहवालामध्ये नेमके कोणते मुद्दे येणार आहेत यावर आता पुढच्या कामकाजाची दिशा ठरणार आहे. डॉ. सुभाष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली दोनजणांच्या पथकाने सीपीआर आणि आयजीमएम रुग्णालयाची पाहणी केली होती.
चौकट
आयजीएमला तातडीने मनुष्यबळ
टास्क फोर्सचे सदस्य बुधवारी संध्याकाळी कोल्हापुरातून परत गेल्यानंतर आयजीएम रुग्णालयाला तातडीने जादा मनुष्यबळ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. डाॅ. अनिल माळी, डॉ. योगेश साळे यांनी आवश्यक मनुष्यबळाची यादी काढली असून टास्क फोर्सचा अहवाल आल्यानंतर हे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.