कोल्हापूर : ‘एनआरसी नको, नको, सीएए नको, नको, एनपीआर नको, नको’ अशा घोषणांनी सोमवारी येथील दसरा चौक दणाणून गेला. केंद्र सरकारच्या या कायद्यांविरोधात कोल्हापुरात संविधान बचाव, देश बचाव कृती समितीच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला. जरी हा मूक मोर्चा असला तरी त्याआधी उपस्थितांनी प्रचंड रोष व्यक्त केला.सकाळी नऊपासूनच दसरा चौकामध्ये या मोर्चासाठी नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यांतून नागरिक मोठ्या संख्येने दसरा चौकात येत होते. या मोर्चासाठी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशीच व्यासपीठ उभारण्यात आले होते.शाहू छत्रपती म्हणाले, शिवाजी महाराजांची स्वराज्याची स्थापना केली आणि महात्मा फुले, शाहू महाराजांनी समतेचा विचार मांडला. हे कायदे लादण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारला जाणार नाही. अभ्यास न करता महाराष्ट्र शासनानेही हा कायदा लादण्याचा प्रयत्न करू नये.प्रा. एन. डी. पाटील यांनी या मोर्चासमोर बोलताना केंद्र सरकारवर तुफानी हल्ला चढविला. जनतेसमोर नरेंद्र मोदी आणि अमित शहा मोठे नाहीत हे दाखवून देण्याची आता वेळ आली आहे. देशातील माणसा-माणसांमध्ये, धर्मा-धर्मामध्ये भांडणे लावणारे हे कायदे आम्हाला मान्य नाहीत. देशात मंदीची लाट आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या प्रश्नांपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी हे सर्व सुरू आहे. दिल्लीचे सरकार भारतीय परंपरेला छेद देऊ पाहत असून त्यांना जाब विचारून हा डाव उधळून लावण्याची गरज आहे.डॉ. गणेशदेवी म्हणाले, नागरिक त्व आणि गणनेसाठी केंद्र सरकार वेगवेगळे कायदे आणत आहे; परंतु हे कायदे केवळ भेद निर्माण करून सत्ता मिळविण्यासाठी आहेत. धर्मा-धर्मात फूट पाडण्याचे काम भाजपचे सरकार करत असून संविधान रक्षणासाठीचा हा दुसरा स्वातंत्र्यलढाच आहे. देशभरातील असंतोषानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावले आहे.‘जेएनयू’च्या विद्यार्थी नेत्या डॉ. अमृता पाठक म्हणाल्या, स्वत :ला देशभक्त सिद्ध करण्यासाठी इतरांना देशद्रोही ठरवण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. जेव्हापासून हे सरकार आले आहे, तेव्हापासून आम्ही ‘जेएनयू’चे विद्यार्थी रस्त्यावरच आहोत. आजतर पूर्ण हिंदुस्थानच जेएनयू बनला आहे. हे फकीर पंतप्रधान आज विदेशी नेत्यांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. डॉ. जयसिंगराव पवार, कॉ. चंद्रकांत यादव, संदीप देसाई यांचीही यावेळी भाषणे झाली.यावेळी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी महापौर हसिना फरास, आर. के. पोवार, डॉ. मेघा पानसरे, व्यंकाप्पा भोसले, सतीशचंद्र कांबळे, प्रा. विश्वास देशमुख, कादर मलबारी, रघुनाथ कांबळे, गणी आजरेकर, गुलाबराव घोरपडे, अतुल दिघे, संभाजी जगदाळे, वसंतराव मुळीक, आदिल फरास,अनिल म्हमाणे, बबन रानगे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.डोक्यावर भगवा, हातात तिरंगामोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिमबांधव भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. कोणत्याही पक्षाचे झेंडे नसल्याने केवळ तिरंगी झेंडे फडकताना या ठिकाणी दिसत होते. महिलांचीही लक्षणीय उपस्थित होती. शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या प्रतिमाही अनेकांनी हातामध्ये धरल्या होत्या. मोर्चाच्या आधी घोषणा देण्यात आल्या; परंतु मोर्चामध्ये एकही घोषणा देण्यात आली नाही.कोल्हापूरचे देणे फेडण्याचा प्रयत्नडॉ. गणेश देवी म्हणाले, माझे शिक्षण कोल्हापुरात झाले आहे. शाहू महाराजांचा विचार येथूनच देशभर गेला आहे. त्यामुळे या कोल्हापूरचे ऋण फेडण्याचा माझा प्रयत्न राहील. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.
‘नागरिक त्व दुरुस्ती कायदा, नको, नको’, कोल्हापुरात विरोधामध्ये विराट मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:28 AM
‘एनआरसी नको, नको, सीएए नको, नको, एनपीआर नको, नको’ अशा घोषणांनी सोमवारी येथील दसरा चौक दणाणून गेला. केंद्र सरकारच्या या कायद्यांविरोधात कोल्हापुरात संविधान बचाव, देश बचाव कृती समितीच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला. जरी हा मूक मोर्चा असला तरी त्याआधी उपस्थितांनी प्रचंड रोष व्यक्त केला.
ठळक मुद्दे ‘नागरिक त्व दुरुस्ती कायदा, नको, नको’, कोल्हापुरात विरोधामध्ये विराट मोर्चाशाहू छत्रपती, एन. डी. पाटील, गणेश देवींची उपस्थिती