कसबा बावडा/कोल्हापूर : येत्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा ठाम विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून येत्या १७ व १८ जूनला मुंबईमध्ये काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र येणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी ईडीची चौकशी लागली आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात उद्यापासून निदर्शने करणार असल्याचे ते म्हणाले. कसबा बावडा येथील श्रीराम विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सत्तारूढ श्री हनुमान पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.सतेज पाटील म्हणाले, भाजपमध्ये सर्व काही ठीक आहे असे कोणी समजू नये. त्यांच्यातही प्रचंड नाराजी आहे. पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे काही ओबीसी आमदार नाराज आहेत. त्याचा परिणाम विधान परिषदेतील मतदानानंतर भाजपला दिसेल. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समन्वय होता. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची मते आम्हाला मिळाली. मात्र, बाकीच्यांनी घोळ केला. यामुळे एक उमेदवार निवडून आला नाही. येत्या विधान परिषदेला आम्ही जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी उमेदवार निवडून आणण्यासाठी जी राज्यसभेत कमतरता राहिली ती कमतरता राहणार नाही. सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपमध्ये सर्व काही ठीक असे कोणी समजू नये, विधान परिषदेतील मतदानानंतर ते दिसेल - मंत्री सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 1:53 PM