महापुरामुळे अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे सर्वांना मदत पोहोचवली जाईल. यातून एकही पूरग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. ते उदगाव येथील बेघर वसाहतीच्या पूरग्रस्त पाहणी दौऱ्यात बोलत होते.
यावेळी चव्हाण म्हणाले, शासन पूरग्रस्तांसाठी जो निर्णय करेल त्याची पूर्णतः अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आरोग्य व स्वछतेबाबत तातडीने पावले उचलावीत, निवारा केंद्रातील पूरग्रस्तांची योग्य व्यवस्था ठेवावी, असे आदेश त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिले. यावेळी जि.प. सदस्या स्वाती सासणे म्हणाल्या, चिंचवाडसारख्या पूर्णतः बाधित असणाऱ्या गावातील सर्वच नागरिक स्थलांतित झाले होते. त्यांना सरसकट सानुग्रह अनुदान मिळावे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, सरपंच कलीमुन नदाफ, उपसरपंच रमेश मगदूम, राजू मगदूम, बाचू बंडगर, सलिम पेंढारी, जगन्नाथ पुजारी, अरुण कोळी, अमोल माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळ- उदगाव, ता. शिरोळ येथील बेघर वसाहतीतील पूरग्रस्तांची समस्या जाणून घेताना सीईओ संजयसिंह चव्हाण, जि. प. सदस्या स्वाती सासणे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ.
छाया- अजित चौगुले, उदगाव