खंडाळा : खंबाटकी घाटातील दुसरा बोगदा येथील शेतकऱ्यांच्यादृष्टीने नुकसानकारक ठरणार आहे. शासनाने शेतकऱ्यांची पिळवणूक करून प्रकल्प उभारू नये. खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध प्रकल्पांसाठी जमिनी देऊन नेहमीच त्यागाची भूमिका घेतली आहे. शासनाकडून खंबाटकी बोगद्यानजीकच दुसरा बोगदा निर्मितीचे काम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये खंडाळा, वाण्याचीवाडी, पारगाव या तीन गावांतील अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प शासनाने सुरू करू नये, अशा मागणीचा ठराव खंडाळा पंचायत समितीच्या वतीने संमत करण्यात आला आहे.खंडाळा पंचायत समितीच्या मासिक सभेचे आयोजन कै. लक्ष्मणराव भरगुडे-पाटील सभागृहामध्ये सभापती मकरंद मोटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, सदस्य राजेंद्र तांबे, आश्विनी पवार, चंद्रकांत यादव, शोभा जाधव, गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्यासह विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध विभागांचा आढावा घेत असताना विभाग प्रमुखांना जनतेसाठी काम करा असे सूचित करण्यात आले. तर धोम-बलकवडी कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व गावांना पाण्याची टंचाई भासू लागली असून, आगामी काळात ही टंचाई दूर करण्यासाठी गावातील धरणे, बंधारे, तलाव भरण्यासाठी संबंधित विभागाने पाणी सोडावे, असा ठराव उपसभापती वंदना धायगुडे-पाटील यांनी मांडला. याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. शिक्षण विभागाचा आढावा घेत असताना सर्वच सदस्यांनी गटशिक्षण अधिकारी यांच्यावर निशाणा साधत नाराजी व्यक्त केली. यावेळी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत चालली असून, ती संख्या वाढली पाहिजे. यासाठी शैक्षणिक दर्जा उत्तम ठेवा, असे राजेंद्र तांबे यांनी सूचित केले. तर सुगम, दुर्गम याविषयीची रचना चुकीची झाली असून, यामध्ये घाटदरे, हरळी, शेखमिरवाडी, वाघोशी या गावांचा समावेश करावा, अशी मागणी चंद्रकांत यादव यांनी करीत नूतन पदाधिकाऱ्यांना यामध्ये राजकारण आणू नये, असे सांगितले. याविषयी वादळी चर्चा झाल्यानंतर संबंधित गावांचा यामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करू, असे सभापती यांनी सांगितल्यावर वादावर पडला.पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेत असताना यादव यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांपुढे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा पाढा वाचला व पशुसंवर्धनच्या डॉक्टरांनी खासगी दुकानदारीला प्रोत्साहन देऊ नये, असे सांगितले. ढिसाळ कारभार पारदर्शक झाला पाहिजे कोणत्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घालू नये व तसे करू दिले जाणार नाही, असे सूचित केले. परिवहन महामंडळाने प्रवाशांचे हित जोपासून सेवा द्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. तर भाटघर-वडवाडी-हरतळी ही बस सुरू करावी, अशी मागणी यादव यांनी केली. लांब पल्ल्यांच्या गाड्या शिरवळ व खंडाळा बसस्थानकात याव्यात यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे तांबे यांनी सूचित केले. शालेय विद्यार्थ्यांची वेळ पाहून गाड्यांचे नियोजन करावे, असे उपसभापती धायगुडे-पाटील व आश्विनी पवार यांनी स्पष्ट केले. कृषी विभागाने जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील बहुसंख्य गावांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. तसेच जास्तीत जास्त गावांचा समावेश करण्यासाठीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. आरोग्य विभागाचा आढावा घेत असताना खंडाळा येथील मंजूर असलेले ट्रामा केअर सेंटर कित्येक दिवस झाले लाल फितीत अडकून पडले आहे. त्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा, असे सूचित करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी कोरडे यांनी जागेचा प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगितल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाहीच्या सूचना केल्या. (प्रतिनिधी)
खंबाटकीत दुसरा बोगदा नकोच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2017 12:19 AM