कोल्हापूर : संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती घेण्यात येऊ नये. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत नोकरभरती थांबविण्यात यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी केली. त्याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. याचे मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असून, त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अशा अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे.
सध्याच्या परिस्थितीत नोकरभरती केली, तर त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आपण समाजाची भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्याल, अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.कुटिल डाव तर नाही ना?मराठा समाज या निर्णयाचा विरोध करणार हे माहिती असूनसुद्धा तुम्ही पोलीस भरती काढली, हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटिल डाव तर नाही ना? अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत असल्याचेही खासदार संभाजीराजे यांनी या पत्रात म्हटले आहे.