कोल्हापूर : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्यावतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. अशा पध्दतीने दबाव टाकणे योग्य नाही. तसेच संभाव्य जे लॉकडाऊन होणार आहे त्यालाही आमचा विरोध असल्याचे निवेदन बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. व्यवसायाची वेळ वाढवून देण्याबाबत आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने देसाई यांची भेट घेतली आणि चर्चा केली. दुपारी प्रचंड ऊन असताना सर्वसामान्य नागरिक स्वत:च्या घरासाठी लागणारी खरेदी करण्यासाठी संध्याकाळीच बाहेर पडतात. परंतु रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाकडून फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. यातून समाजातील सर्वच घटकात असंतोष वाढत चालला आहे. याची दखल घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विक्रम राठोड, कालिदास बोरकर, नजीर देसाई, अशोक लोहार, गायत्री राऊत, अप्पा लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
अन् जिल्हाधिकारी भडकले
हेमंत आराध्ये प्रास्ताविक करीत असताना साहेब, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तेव्हा रात्रीची वेळ वाढवावी असे सांगू लागले. यावेळी जिल्हाधिकारी देसाई भडकले. ‘कमी संख्या आहे तर चांगले आहे ना, आता संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करूया का? असा प्रश्न त्यांनी विचारला. नंतर मात्र ‘मी तुमच्या पाया पडतो.. .तुम्ही खाली बसा’ असे सांगून देसाई यांनी हा विषय संपविला.
३१०३२०२१ कोल बीजेपी
भाजपच्यावतीने महेश जाधव आणि राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना लॉकडाऊनच्या विरोधामध्ये निवेदन दिले.