राजाराम लोंढेकोल्हापूर : गेल्या २१ दिवसांत शिरोळ तालुक्यातील ‘शिरोळ’ व ‘कुरुंदवाड’ या मंडळांत पावसाचा एक थेंबही झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले असून वाढ खुंटली आहे. कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीचा नजर अंदाजाचे काम सुरू केले असून विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही कमी-अधिक प्रमाणात पिकांना झटका बसला असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.मान्सूनच्या गेल्या तीन महिन्यांत जेमतेम महिनाभर पाऊस झाला असून दोन महिने पावसाचा लपंडाव सुरू आहे. मुळात पेरण्या उशिरा झाल्याने सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पिकांची मुळे कोवळी असल्याने त्यांना पाण्याची गरज आहे. मात्र, पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. आज पाऊस सुरू होईल, उद्या सुरू होईल, या आशेवर शेतकरी रोज आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कडकडीत ऊन पडत असल्याने चिंता वाढली असून, मोठ्या कष्टाने जगवलेली पिके डोळ्यांसमोर करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले आहे.
शिरोळ तालुक्यातील दोन मंडळांमध्ये तब्बल २१ दिवसांपासून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये ८ ते १० दिवस पाऊसच नाही.पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
जिथे पाण्याची सोय आहे, तिथे पाणी देऊन तर जिथे नाही तिथे घागरीने पाणी आणून पिकांना जगवण्याची धडपड शेतकऱ्याची सुरू आहे.कृषी अधिकाऱ्यांचे दौरे सुरू
पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या अधिकारी दौऱ्यावर असून तालुकानिहाय आढावा घेऊन उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.पावसाचा अंदाज आणि ढगाळ वातावरण
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस होताना दिसत नाही. शुक्रवारपासून तुरळक पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या आहेत. मंगळवारपासून (दि. ५) जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.कमी वाढीवर फुलोरा येण्याचा धोकावाढ सुरू असताना पाणी मिळाले नाहीतर पूर्ण वाढ होणार नाही. त्यामुळे वाढ न होताच शेंगा, फुलोरा येण्याचा धोका अधिक असल्याचे मत कृषी विभागाचे आहे.
शेततळ्याला महत्त्व आलेशासनाने मागेल त्याला शेततळे देण्याची योजना आणली आहे. मात्र, जिल्ह्यातून त्याला अत्यल्प प्रतिसाद आहे. पावसाच्या काळात शेततळी भरून ठेवली असती तर त्याचा वापर आता करता आला असता, त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेततळ्याचे महत्त्व कळले आहे.
पावसाने ओढ दिल्याने माळरान, डोंगरमाथ्यावरील खरीप अडचणीत आले आहे. पाण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी पाणी देण्याची गरज आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस सुरु होईल, असा अंदाज आहे. - दत्तात्रय दिवेकर (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)