कोल्हापूर : येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे मुख्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे; परंतु, हे कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व विशेष पोलिस महानिरीक्षक यांना दिले आहे.आमदार पी.एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांनी हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ व विशेष पोलिस महानिरीक्षक यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यापार उद्योग, व्यवसाय व शिक्षण याबाबतीत कोल्हापूर महत्त्वाचे केंद्र आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापूरमध्ये विशेष पोलिस महानिरीक्षकांचे कार्यालय कार्यरत आहे. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण भागातील नागरिकांना हे जवळच्या अंतरावर व सोयीचे आहे. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखाच्या आसपास असून कर्नाटक, गोवा राज्य व कोकण विभागाला कोल्हापूर जिल्हा जोडला जात असल्याने कोल्हापुरात पोलिस आयुक्तालयाची मागणी सातत्याने होत आहे. असे असतानाच आमदार राहुल कूल यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याबाबत मागणी केली असल्याचे समजते, ती चुकीची आहे.
कोल्हापुरातील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे स्थलांतर नको, काँग्रेस आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 11:57 AM