कोल्हापूर : शहरात जनता कर्फ्यूला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. मोजक्या व्यावसायिकांचा पाठिंबा वगळता नेहमीप्रमाणे बाजारपेठा गजबजलेल्या होत्या.
केवळ लक्ष्मीपुरी धान्य बाजार, शिवाजी स्टेडियम येथील व्यावसायिक आणि चप्पल लाईन येथील दुकानदारांनी सर्व दुकाने बंद ठेवून कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवला. परिणामी जनता रस्त्यावर आणि कोरोना मानगुटीवर असे चित्र पाहण्यास मिळाले.जनता कर्फ्यूबाबत काही नागरिक, संघटना आणि व्यापाऱ्यांचा विरोध झाला. यामुळे महापौर निलोफर आजरेकर यांनी पोलीस अथवा महापालिका प्रशासनाचा कोणताही दबाव राहणार नाही. कुटुंबीयांच्या जिवासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
प्रत्यक्षात मात्र, शुक्रवारी याला व्यावसायिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. शहरात नेहमीप्रमाणेच काही दुकाने वगळता बहुतांश दुकाने सुरू होती. बाजारपेठेच्या परिसरात नागरिकांची लगबग सुरू होती.
जोतिबा रोड, पापाची तिकटी ते माळकर तिकटी येथील दुकाने सुरू होती; तर पापाची तिकटी ते गंगावेश येथील बहुतांश दुकाने बंद होती. जनता कर्फ्यूबाबत संभ्रम असल्याने बहुतांश नागरिकांनी बाजारपेठेत येणे टाळले.