कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वे स्थानकावर रोज चार विशेष रेल्वेची ये-जा सुरू आहे. त्यातून दिवसभरात किमान पाच हजार प्रवाशांचीही ये-जा होते. मात्र, या प्रवाशांची रेल्वेस्थानकावर कोणत्याही प्रकारची आरटीपीसीआर अथवा रॅपिड ॲंटिजेन टेस्ट केली जात नाही. त्यामुळे कोरोना वाहकांची संख्या वाढण्याचा धोका वाढला आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारने तीन महिने लॉकडाऊन जाहीर केला. त्यात २४ मार्च २०२० ला कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वेस्थानकातून सुटणाऱ्या १६ रेल्वे बंद केल्या. त्यामध्ये परराज्यात जाणाऱ्या मजुरांची संख्या लक्षात घेता रेल्वेने विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या. त्यातून हजारो प्रवाशांनी उत्तरप्रदेश, गया, धनबाद, बिहार आदी ठिकाणी प्रवास केला.
लॉकडाऊननंतर काही प्रमाणात पूर्वपदावर आलेल्या परिस्थितीनंतर कोयना, महाराष्ट्र , तिरुपती, महालक्ष्मी आणि धनबाद एक्सप्रेस या पाचच विशेष रेल्वे नाव बदलून सुरू केल्या. त्या हाऊसफुल्ल गर्दीत सुरू होत्या. कोरोनाची पुन्हा दुसरी लाट आल्यानंतर या पाचही रेल्वेमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या काही प्रमाणात रोडावली. किमान या रेल्वेतून पाच हजारांहून अधिक प्रवासी कोल्हापूरात ये-जा करू लागले आहेत.
विशेष म्हणजे या प्रवाशांची कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकात आल्यानंतर बाहेर जाताना आरटीपीसीआर किंवा रॅपिड ॲंटिजेन टेस्ट केली जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार व फोनद्वारे मागणी केली आहे. मात्र, नेहमीप्रमाणे जिल्हा व महापालिका प्रशासनाने अद्यापही त्यांचा मागणीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.