वारणानगर : वारणानगरमध्ये कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु केलेल्या "नो शेव्ह नोव्हेंबर" मोहिमेचा कॅन्सरग्रस्त कुटुंबांना मदत होत आहे. पुढील काळात या मोहिमेने व्यापक स्वरुप धारण करुन जास्तीत जास्त कॅन्सर ग्रस्तांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी येथे केले.वारणा कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत जाधव यांच्या संकल्पनेतून "नो शेव्ह नोव्हेंबर कँपेन फॉर कॅन्सर पेशंट" उपक्रमांतर्गत वारणा कॅन्सर फौंडेशननं केलेल्या आवाहनाला समाजातील दानशूरांनी चांगला प्रतिसाद दिला.मोहिमेचे दहावे वर्ष असून मोहिमेतून संकलित झालेल्या रक्कमेतून अशोक शिंदे (पारगांव), मंगल हिरवे(माले) या दोन गरजू कॅन्सरग्रस्तांना कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे आणि कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केलेले बहिरेवाडी गावचे महादेव सरनाईक यांच्या हस्ते प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
समाजामध्ये लोक आम्हाला वेगळ्या नजरेने बघतात,सापत्न वागणूक देतात.पण वारणा कॅन्सर फाउंडेशनने "नो शेव्ह नोव्हेंबर"च्या माध्यमातून समाजामधील ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचा आम्हाला आर्थिक फायदा पण झालेला आहे. याबद्दल आम्ही वारणा कॅन्सर फाऊंडेशनचे ऋणी आहोत.
यावेळी हिम्मत कुंभार , राजेंद्र जाधव,प्रथमेश पाटील, राजकुमार जाधव,प्रविण पाटील,संदीप जाधव उपस्थित होते. राजू जमदाडे यांनी आभार मानले.