कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमुळे सध्या मराठा आरक्षण प्रश्नावर आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणे धोक्याचे आहे. यामुळे रस्त्यावर न येता आरक्षण मिळण्यासाठी काय करायला हवे, यासंबंधी अभ्यास करू, आक्रमक आंदोलनाची तलवार हातात घ्यायला नको, असा सबुरीचा सल्ला खासदार संभाजीराजे यांनी सोमवारी दिला.
आझाद गल्लीतील सकल मराठा शोर्यपीठाच्या राज्यव्यापी एल्गार जन आंदोलन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आझाद गल्लीतील विठ्ठल मंदिर परिसरात बैठक झाली.
ते म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नावर एकमेकांवर ताशेरे ओढण्याची ही वेळ नसून, सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची आहे.
यावेळी सकल मराठा समन्वयक प्रसाद जाधव यांनी मराठा आरक्षण लढ्यांचा आढावा घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी राजू जाधव, अजित पवार, सरिता पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
याप्रसंगी प्रकाश सरनाईक, दीपक खांडेकर, महादेव आयरेकर, संजय साडविलकर, चंद्रकांत चिले, आकाश शेलार, संजय जाधव, दादासाहेब देसाई, किशोर घाडगे, फत्तेसिंह सावंत, गिरीश जाधव, अख्तर इनामदार, पप्पू शेख, सनी शिंदे, अनिकेत बिराडे, सुशांत बोरगे, अवधूत दळवी, रियाज कागदी आदी कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. दरम्यान, बैठकीनंतर खासदार संभाजीराजे यांनी सखल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक सचिन तोडकर, दिलीप पाटील आदींची भेट घेऊन चर्चा केली.