कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे ठेकेदार ‘जीकेसी’ कंपनीला केंद्र सरकारच्या अटीप्रमाणे ४८८ कोटींच्या कामासाठी १० टक्क्यांप्रमाणे ४८ कोटी अॅडव्हान्स (आगाऊ रक्कम) देता येतात. ठेकेदारास महापालिकेने अॅडव्हान्स दिलेला नाही. ठेकेदाराकडून अॅडव्हान्सच्या ११० टक्के जादा म्हणजेच ५४ कोटी रुपयांची बॅँक गॅरंटी घेतली जाणार आहे. संपूर्ण ५२ किलोमीटरची पाईप सरकारी जागेतून जाते. सर्व प्रकारच्या सर्वेक्षणासह पाटबंधारे विभागाकडून १.३५ हेक्टर जमिनीचा ताबाही मिळाला आहे. येत्या डिसेंबरच्या मध्यापर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. केंद्राच्या नियमाप्रमाणेच निविदा व कामाची प्रक्रिया व पैसे अदा केले जाणार असल्याने पाईपलाईनबाबत ‘नो टेन्शन’ असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.पाटबंधारेमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, योजना राबविताना पारदर्शकता नाही. ठेकेदारास १०० कोटी रुपयांचा अॅडव्हान्स दिलेला आहे; त्यामुळे केंद्राकडे योजनेबाबत तक्रार करणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने ‘लोकमत’कडे योजनेबाबत संपूर्ण खुलासा केला.ठेकेदारास अॅडव्हान्स दिल्यानंतर एक वर्षात त्या रकमेचे काम न झाल्यास बॅँक गॅरंटीच्या रकमेतून अॅडव्हान्स रक्कम वजा करण्याची तरतूद आहे. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर ठेकेदारास केंद्राच्या नियमानुसारच पैसे दिले जाणार आहेत. संपूर्ण ५२ किलोमीटर मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ५२ किलोमीटरसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पायरल वेल्डेड पाईपपैकी ४० टक्के पाईपची आॅर्डर ठेकेदाराने दिली आहे. ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाईप मागविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील १७ किलोमीटर पाईपलाईनच्या जागेसाठी पीडब्ल्यूडी व जिल्हा परिषदेकडे परवानगी मागतली आहे.या मार्गातील झाडांची किंमत ठरविण्यासाठी वन विभागाकडे फीसाठीचे पैसे भरले आहेत. धरणाजवळ १५ लाख लिटर पाण्याची टाकी व कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या सोयीसाठी आवश्यक १.३५ हेक्टरची जागा पाटबंधारे विभागाने मंजूर केली आहे. पुईखडी ते चंबुखडी, पुईखडी ते शेंडा पार्क, पुईखडी ते फुलेवाडी या मार्गातील १८ किलोमीटर पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पाण्याची टाकी व जलशुद्धिकरण केंद्राचे हायड्रॉलिक व आरसीसी आराखडा तयार आहे. पुढील आठवड्यात तो शासकीय तंत्रनिकेतनकडून मंजूर करून घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)पाईपलाईन योजनेची तयारी५४ कोटींच्या बॅँक गॅरंटीनंतर ४८ कोटी अॅडव्हान्स देण्याची तरतूदएक वर्षात काम न झाल्यास गॅरंटीतून रक्कम वजा करणार५२ किलोमीटरचा सर्व्हे पूर्ण; संपूर्ण पाईप सरकारी जागेतूनधरणाजवळ पाण्याच्या टाकीसाठीची १.३५ हेक्टर जागा पाटबंधारे विभागाने दिली.निविदेप्रमाणेच काम व त्याप्रमाणेच पैसे अदा केले जाणार१७ किलोमीटरच्या मार्गातील झाडांचे सर्वेक्षण पूर्ण; वनविभागाकडून नुकसानीचा अभिप्राय मागविणार.पाण्याच्या टाक्यांना जोडणाऱ्या १८ किलोमीटर पाईपचा सर्व्हे पूर्णठेकेदारास एक रुपयाही अॅडव्हान्स दिलेला नाही.डिसेंबरच्या मध्यापर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात.
पाईपलाईनबाबत ‘नो टेन्शन’
By admin | Published: November 05, 2014 12:44 AM