शिये / हरी बुवा
: शिये फाट्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून, वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. येथील अतिक्रमण हटविण्यासाठी वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे येथूनच जाणाऱ्या राज्य मार्ग १९४ च्या हद्द निश्चितीसाठी जागा माेजणी आवश्यक असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमी अभिलेख कार्यालयाकडे दोन वर्षांपूर्वी दोन लाख बावीस हजार रुपये भरले आहेत. मात्र, अद्यापही राज्य मार्गाच्या हद्दीची मोजणी झालेली नाही. ही मोजणी न झाल्यानेच अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावले आहे. शिये ते बावडा पुलापर्यंत वाहतुकीस अडथळा होत असलेल्या रस्त्यालगतच्या टपऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर बांधकाम विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्याने अतिक्रमण वाढतच असल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्या आहेत. पण याकडे गांभीर्याने संबंधित अधिकारी पाहत नसल्याचा आरोप तक्रारदार करत आहेत.
कोट : संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली आहे. प्रत्यक्ष जागेची भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करुन लवकरच रस्त्याकडील अतिक्रमण काढले जाईल. डी. आर. भोसले, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
कोट : राज्य मार्गावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याच्या तक्रारी संबंधित विभागाला वारंवार देऊनही फक्त नोटीस बजावण्यापलीकडे संबंधित विभाग कोणतीच कारवाई करत नाही.
संकेत सावंत, नागरिक
.