कोल्हापूर : चार दिवस सुट्टीसाठी पुण्याहून कोल्हापूरला आलेली साडेतीन वर्षाची मुग्धा गौरव मंकाळे गेल्या दोन महिन्यांपासून साने गुरुजी वसाहतीतील तिच्या आजी-आजोबांकडे राहत आहे. तिची आणि आई-वडिलांची भेट झालेली नाही. आठवण आल्यानंतर ती त्यांच्याशी मोबाईलद्वारे बोलते. कोरोना भयंकर आहे, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. तुम्ही घरीच थांबा, कोरोना गेल्यानंतर मी तुमच्याकडे येते, असे ती आई-वडिलांना सांगते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूची घोषणा झाल्याने चार दिवस सुट्टी मिळाल्याने दि. १८ मार्चला वडील गौरव, आजी चंदाराणी यांच्यासमवेत मुग्धा ही कोल्हापुरातील आजी वैशाली, आजोबा नाना यांच्याकडे राहायला आली. दोन दिवस राहून तिचे वडील पुण्याला रवाना झाले.
जनता कर्फ्यूनंतर पहिल्यांदा राज्याचा आणि नंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर झाला. त्याची मुदत वाढत गेल्याने मुग्धा आणि तिच्या पुण्यातील आजीचा कोल्हापुरातील मुक्काम वाढला. ती दिवसातून दोन ते तीनवेळा आई सोनल, वडिलांशी मोबाईलद्वारे बोलते. कोरोनाबाबतचा तिने दिलेला हा संदेश वेगळेपण दाखवून देणारा आहे. तिचा या संदेशाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.