कोल्हापूर : भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटीलने संकल्प केलेला ‘रोटरी नृत्यसंस्कार’ हा विश्वविक्रम १० जानेवारीला होणार आहे. हा कार्यक्रम फक्त माझा नाही, तर कोल्हापूरचा लोकोत्सव आहे, या भावनेने कोल्हापूरकरांनी सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन संयोगिता व शोभा पाटील यांनी केले आहे. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर १० जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी पाच वाजता लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून एकल आणि ग्रुपचे नृत्य सादरीकरण, लेसर शो, देहदान-नेत्रदान, महिला सबलीकरणावर सादरीकरण होणार आहे. या विश्वविक्रमाला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या विश्वविक्रमास सहभागी मुला-मुलींची संख्या कमी आहेच; शिवाय अर्थसाहाय्यदेखील मिळालेले नाही. कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी हा उपक्रम यशस्वी व्हावा, यासाठी खंबीर पाठबळ द्यावे. आपले अर्थसाहाय्य स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ३३३८०१७९०८९ या खात्यावर तपस्या सिद्धी कला अकादमीच्या नावे जमा करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी अमोल कोरगावकर उपस्थित होते.आता वेळ अटीतटीची...कोल्हापुरात जे घडते त्याचा आदर्श देशपातळीवर घेतला जातो, अशी या शहराची ख्याती आहे. कलांचे माहेरघर अशी बिरूदावली मिरवताना या नृत्यसंस्कार विश्वविक्रमाची घोषणा होऊन एक वर्ष लोटले आहे. मात्र कोल्हापूरवासीयांनी त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. कार्यक्रमासाठी आजवर ५० लाख रुपये खर्च झाले आहेत. आणखी तितकाच खर्च होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला आता सहकार्य लाभले नाही तर आर्थिक नुकसान तर होणार आहेच; शिवाय कोल्हापूरच्याच नावलौकिकालाही बाधा पोहोचणार आहे.
नृत्यसंस्कार विश्वविक्रमी व्हावा
By admin | Published: December 25, 2014 11:36 PM