कोल्हापूर : सर्वसामान्यांचे खासदार म्हणून शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची ओळख आहे. त्यांनी खासदारकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले असून त्यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी जिल्ह्यातील मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक व राजकारणामध्ये स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे योगदान मोठे आहे. स्वर्गीय मंडलिक यांना माननारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. ही स्वाभीमानी जनता खासदार संजय मंडलिक यांच्या मागे ठामपणे उभी असून त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही सर्व जनता कंबर कसून कामाला लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या समाजकारण, राजकारण सहकारामध्ये संजय मंडलिक यांची एक वेगळी ओळख आहे. जिल्ह्याच्या राजकारण सहकारामध्ये सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून संजय मंडलिक कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याचा विकासाचा आलेख वेगाने वाढतो आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी सर्वांना सोबत घेवून जिल्ह्याचा विकास केला असून त्यांच्याकडे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून कोल्हापूर जिल्हा पाहत होता. आता त्यांच्या नंतर खासदार मंडलिक यांचेकडूनही तीच अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत. यासाठीच आगामी लोकसभा निवडणूकीत त्यांना शिवसेनेची उमेदवारी द्यावी.
संजय मंडलिक यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या; आमदार प्रकाश आबिटकरांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आग्रह
By विश्वास पाटील | Published: March 09, 2024 6:55 PM